Published On : Wed, May 5th, 2021

आनंदी रहा, काळजी घ्या; यंत्रणेला सहकार्य करा

Advertisement

‘कोव्हिड संवाद’मध्ये डॉ.मनीषा शेंबेकर आणि डॉ.कमलाकर पवार यांचे आवाहन

नागपूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला बळी पडू नये यासाठी प्रशासन आणि यंत्रणेकडून वारंवार नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. आपल्यामुळे दुस-यांना कोरोनाची लागण होउ नये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, बाहेर जायची गरज पडल्यास मास्क वापरा, सॅनिटाजरचा वापर करा, हात धुवा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व परिस्थितीमध्ये आनंदी रहा. आनंदी राहत स्वत:सह इतरांच्या आरोग्याची काळजी, यंत्रणेला सहकार्य करा, असे आवाहन प्रसिद्ध भूलतज्ज्ञ तथा भूलतज्ज्ञ सोसायटीच्या माजी अध्यक्ष डॉ.मनीषा शेंबेकर आणि प्रसिद्ध भूलतज्ज्ञ तथा आय.एम.ए.चे कोषाध्यक्ष डॉ.कमलाकर पवार यांनी ‘कोव्हिड संवाद’मध्ये केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने व महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेने सुरू करण्यात आलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी (ता.५) डॉ.मनीषा शेंबेकर आणि डॉ.कमलाकर पवार यांनी ‘कोव्हिडमध्ये भूलतज्ज्ञ यांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन केले व यावेळी नागरिकांमार्फत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देउन त्यांनी शंकांचे निराकरण केले.

आज नागपूर शहरात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने सुरक्षेची सर्व काळजी घेण्याची गरज आहे. नागपूर शहरामध्ये एकूण ६०० खासगी रुग्णालये आहेत. या ६०० रुग्णालयांपैकी १५० रुग्णालय कोव्हिड रुग्णांना सेवा देत असून यामधील १२० डॉक्टर कोरोना संक्रमीत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्व आरोग्य कर्मचारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत त्यांना सहकार्य करा, असेही आवाहन त्यांनी केले.

वैद्यकीय क्षेत्रामध्ये भूलतज्ज्ञाची विमानाच्या पायलटशी तुलना केली जाते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला भूल देण्यापासून ते शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला त्यातून सुखरूप हळुहळू बाहेर काढणे ही महत्वाची भूमिका भूलतज्ज्ञ पार पाडतात. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये भूलतज्ज्ञ महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. कोव्हिडची लागण झालेल्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन द्यावे लागते. त्यांना आयसीयू मध्ये ठेवावे लागते. रुग्णाला ऑक्सिजन किती द्यावे, कुठल्या प्रकारे द्यावे हे आजाराच्या तीव्रतेवर ठरविले जाते. कुठल्या रुग्णाला ऑक्सिजन थेरेपी देणे गरजेचे आहे व त्याला कशाने फायदा होईल. हे ठरविणे व त्यानुसार उपचार करण्यामध्ये भूलतज्ज्ञांची भूमीका महत्वाची आहे, अशी माहिती डॉ.मनीषा शेंबेकर आणि डॉ.कमलाकर पवार यांनी दिली.

एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाची शस्त्रक्रिया करावी लागल्यास ती कोव्हिड हॉस्पिटलमध्येच केली जावी. अशा वेळी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय चमू यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. त्यामुळे त्यांनी सुरक्षा साहित्यांचा योग्य वापर करावा. कोरोना रुग्णाला शस्त्रक्रियेपूर्वी भूल देताना शक्य असल्यास ‘जनरल एनेस्थेसिया’ देणे टाळावे. यामुळे रुग्ण पूर्ण बेशुध्द केला जातो व त्याला कृत्रिम श्वाशोच्छवास दिला जातो. त्यामुळे ऑपरेशन थेटर मधील लोकांना कोरोनाचा धोका जास्त संभावतो. त्यामुळे रूग्णाची परिस्थिती शस्त्रक्रिया करण्याचा भाग पाहून त्या पद्धतीची भूल दिली जावी, असेही ते म्हणाले.

आजच्या या कोरोनाच्या संकटामध्ये प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. थोडासा ताप, खोकला, थकवा, श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यास दुर्लक्ष करू नका, तातडीने कोव्हिड चाचणी करा. चाचणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरीत उपचार सुरू करा. गरोदर महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी. गरोदर मातेमुळे बाळाला कोरोनाचा धोका नाही, त्यामुळे घाबरून जाउ नका पण काळजी घ्या. याशिवाय प्रत्येक व्यक्तीने सुद्धा सकारात्मक विचारसरणी बाळगावी. स्वत: घाबरून न जाता व इतरांनाही न घाबरवता आनंदी रहावे. स्वत:च स्वत:च्या मताने औषधे घेउ नका. कोव्हिडच्या या संकटात स्वत:सह इतरांचा बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करा, लस घेण्यासाठी पुढाकार घ्या, असा मोलाचा सल्लाही डॉ.मनीषा शेंबेकर आणि डॉ.कमलाकर पवार यांनी दिला.