नागपूर : आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. त्यानिमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरा पिठ या पदार्थांचे सेवन केले जाते. हे पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ खातांना खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे.
भगरीवर मोठया प्रमाणात अस्परजिलस या प्रजातीच्या बुरशीचा प्रभाव होतो. ज्यामुळे फ्युमिगाक्लेविन यासारखे विषद्रव्य तयार होतात. जुलै महिन्यातील तापमान व आर्द्रता बुरशीच्या वाढीसाठी अनुकुल असते. अशा बुरशीचा प्रादूर्भाव झालेली भगर खाण्यात आल्यास अन्न विषबाधा होऊ शकते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नागरिकांसाठी काही सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरा पिठ व खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे. प्रक्रिया उद्योगात भगर, साबुदाणा, सिंगाडा पिठ, राजगिरा पिठा खादयतेल यांचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो तो पाहुन घ्यावा. त्यासह बेस्ट विफोर म्हणजे त्या अन्नपदार्थाची मुदत केव्हा कालबाहय होते तेही तपासून पाहावे. खुल्या भगरीचे पीठ बाजारातून विकत घेऊ नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवून त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. भगरीच्या पीठामध्ये वातावरणातील ओलावा शोषुन घेण्याची क्षमता अधिक असते, त्यामुळे पीठाला बुरशीची लागण होण्याची शक्यता जास्त असते. भगरीच्या दशम्या किंवा भाकरी खाण्याऐवजी खिचडी खावी. भगर साठवितांना ती स्वच्छ कोरड्या ठिकाणी, व्यवस्थित झाकण बंद डब्ब्यात ठेवा, जेणेकरुन वातावरणातील ओलाव्यामुळे बुरशीची वाढ होणार नाही. जास्त दिवस भगर साठवु नका. जास्त दिवस साठविलेली भगर खाऊ नका. भगरीचा वापर करताना ती स्वच्छ धुवन घ्यावी. उपवासाचे अन्न पदार्थ व घटक पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्यांकडुन बिल घेण्यात यावे. भगर, साबुदाणा, सिंगाडा व राजगिरा पिठापासुन तयार उपवासाचे अन्न पदार्थ लगेच सेवन करावे. शिळया अन्न पदार्थाचे सेवन करु नये म्हणजे संभाव्य अपाय टाळता येईल.
दुकानदारांना सूचना
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने दुकानदारांनाही काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आले आहे. यात विनाबिलाने कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये. चांगल्या प्रतीची भगर व पॅकबंदच अन्नपदार्थ विक्री करावे. मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ विकी करु नये.
भेसळ किंवा आक्षेपार्ह आढळुन आल्यास अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक (0712) 2562204 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.