Published On : Wed, Oct 7th, 2020

प्लाझ्मा दाते व्हा; इतरांचा जीव वाचवा!

Advertisement

‘कोव्हिड संवाद’: डॉ. हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांचा संदेश

नागपूर : कोव्हिडसाठी जालीम औषध अथवा लस अद्यापही उपलब्ध नाही. मात्र ‘प्लाझ्मा’ हा एक महत्वाचा पर्याय म्हणून पुढे येत आहे. ‘प्लाझ्मा’ संदर्भात झालेल्या अभ्यासातून ‘आरबीडी’ (रिसेप्टर बॉयडिंग डोमेन) प्लाझ्मा ही प्रगत उपचार पद्धती आहे व त्याचे परिणामही उत्तम दिसून आले आहे. कोव्हिड शरीरामध्ये प्रवेश करून पेशींवर आघात करून बाधित करण्याचे काम करतो. आरबीडी प्लाझ्माद्वारे पेशींची प्रतिकारशक्ती वाढवून विषाणूला बाहेरच थांबविले जाते त्यामुळे व्हायरस तिथेच मृत होतो. त्यामुळे ही उपचार पद्धती अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मात्र यासाठी कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांनी पुढे गरज आहे. कोरोनाला हरवून आलेल्यांना प्लाझ्मा ही शक्ती निसर्गाने प्रदान केलेली आहे, ज्याद्वारे ते इतरांचा जीव वाचवू शकतात.

प्लाझ्मा दान करणा-यावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. सर्व सुरक्षा साधनांचा वापर करूनच प्लाझ्मा घेतला जातो. यासाठी प्रत्येक कोव्हिड योद्ध्याने पुढे यावे. ‘कोरोनाला हरवून आलेल्यांनो प्लाझ्मा दाते व्हा आणि इतरांचा जीव वाचवा’, असा मोलाचा संदेश मेडिकल संचालक, आरबीडी प्लाझ्मा बँक, लाईफलाईन रक्तपेढीचे डॉ.हरीश वरभे आणि प्रभारी क्रिटिकल केअर फिजीशियन, कोव्हिड युनिट भवानी हॉस्पिटलचे डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी दिला.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएनशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात बुधवारी (ता.७) ते ‘कोव्हिड प्लाझ्मा दान आणि आरबीडी-प्लाझमा उपचार’ या विषयावर बोलत होते. यावेळी नागरिकांकडून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांच्या शंका या सर्वांना त्यांनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

येणा-या काळात आपणा सर्वांनाच कोरोना सोबत जगावे लागणार आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व सुरक्षा साधनांचा वापर करणे अनिवार्य आहे. आज कोरोना बाधितांसाठी प्लाझ्मा हे वरदान आहे. मागील १०० वर्षांपासून प्लाझ्माचा महामारीमध्ये उपयोग केला जात आहे. महामारीचा सामना करून त्यातून सुखरूप बरे झालेल्यांचा प्लाझ्मा फायदेशीर ठरतो. रक्तामध्ये प्रामुख्याने चार मुख्य घटक असतात. श्वेत रक्तपेशी (व्हाईट ब्लड सेल्स), तांबड्या रक्तपेशी (रेड ब्लड सेल्स), रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) आणि रक्तद्रव (प्लाझ्मा). प्लाझ्मा दात्यांच्या शरीरातून रक्त देतेवेळी अद्ययावत उपकरणाद्वारे केवळ प्लाझ्माच घेतला जातो. यामध्ये प्लाझ्मा दात्याला कोणताही धोका नाही.

प्लाझ्मा दान केल्याने आणखी जास्त अशक्तपणा येतो, प्रतिकारशक्ती कमी होते हे सर्व गैरसमज आहेत. दात्याच्या शरीरातून ४०० मिली प्लाझ्मा घेतला जातो आणि विशेष म्हणजे त्यातून दोन लोकांचा जीव वाचविता येतो. कोव्हिड रुग्णाला जेवढ्या लवकर प्लाझ्मा दिला जाई तेवढी जास्त रुग्ण बरा होण्याची शक्यता असते. आधी अद्ययावत उपकरणे नसल्याने प्लाझ्मा दिल्यानंतर काही दुष्परिणाम दिसायचे. आज मात्र आरबीडी द्वारे ती शक्यता अत्यल्प झाली आहे. त्यामुळे आज रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मा दान शिबिर राबविणेही अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोव्हिडमधून बरे झालेल्यांसह सर्वांनीच पुढे यावे, असे आवाहन डॉ.हरीश वरभे आणि डॉ. कौस्तुभ उपाध्ये यांनी केले.