नागपूर : दुष्काळी परिस्थिती, पडीक जमिनींचा प्रश्न, शेतकरी मोर्चा, मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली, नागपूरच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि लाडकी बहीण योजना अशा विविध मुद्द्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाम भूमिका मांडली. मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्यांनी शेती उत्पादनासाठी वापरावी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत सरकारचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपल्या आधीच्या विधानावरही स्पष्टीकरण दिले.
नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बोअरवेल खोदण्यात आल्या, मात्र भूजल पुनर्भरणाची व्यवस्था न झाल्याने पाणीपातळी खालावली आहे. यावर उपाय म्हणून पाच हजारांहून अधिक जलतारे आणि तीन हजार रिचार्ज शाफ्ट उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाव, गाव तलाव आणि पाझर तलाव खोल करण्यावरही भर दिला जाणार आहे. गावातील पाणी गावात आणि शिवारातील पाणी शिवारातच अडवण्याचे नियोजन असून, पुढील पाच वर्षांत भूजल पातळी सुधारण्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नागपूरच्या पाणीपुरवठ्याच्या भविष्यातील नियोजनासाठी कन्हान नदीवर कामठी-कोलार बॅरेज उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपये, तर पेरी-अर्बन भागातील पाणी वितरणासाठी ४०० कोटी रुपये लागणार आहेत. एकूण १,४०० कोटी रुपयांच्या योजनेला हिवाळी अधिवेशनात अंतिम स्वरूप दिले जाणार असून, हा प्रकल्प नागपूरच्या पुढील ५० वर्षांच्या पाणीप्रश्नासाठी महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
पडीक जमिनीच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे यांनी १९४८ च्या कुळ कायद्यातील कलम ६५ चा संदर्भ दिला. तीन वर्षे जमीन पडीक ठेवल्यास ती शासनाच्या व्यवस्थापनाखाली येऊ शकते, अशी तरतूद असल्याचे सांगत, हा निर्णय सर्वसामान्य किंवा स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांकडून ५० ते १०० एकर किंवा शेकडो एकर जमीन खरेदी करून ती पडीक ठेवणाऱ्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत शेती उत्पादनासाठी वापरावी, अशी सरकारची भूमिका आहे. राज्याला जमीन पडीक राहणे परवडणारे नाही, असे बावनकुळे यांनी ठामपणे म्हटले आहे.
या मुद्द्यावर राजू शेट्टी यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सांगत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विरोधात या कायद्याचा वापर केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महसूल मंत्रालय हे शेतकऱ्यांचे संरक्षण आणि जमिनींचे व्यवस्थापन करण्यासाठी आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
नागपुरातील वृक्षांना खिळे ठोकण्याच्या प्रकरणात कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असून, पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. महाजेनकोच्या २० एकर जागेवर नर्सरी उभारण्यात आली असून, दरवर्षी किमान पाच हजार झाडे लावण्याचे नियोजन आहे. महाजेनकोच्या पडीक जमिनी वृक्षलागवडीखाली आणण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्याशी संबंधित आदिवासी जमीन प्रकरणात केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, आरोपांमध्ये तथ्य असल्यास मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावे, सरकार चौकशी करेल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांची वारंवार बदनामी करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
रोहित पवार यांच्या शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाच्या घोषणेवर बावनकुळे यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. दुष्काळ निवारण समितीच्या बैठकीत रोहित पवार यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी म्हटले. चर्चा न करता केवळ राजकीय अस्तित्वासाठी मोर्चा काढायचा असेल, तर तो त्यांचा प्रश्न असल्याची टीकाही त्यांनी केली.
लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत, आर्थिक ताण असला तरी सरकार तो हाताळण्यास सक्षम आहे आणि पुढील काळात योजना अधिक मजबूत केली जाईल, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
भूदान चळवळीतून दिलेल्या जमिनी लाभार्थ्यांनी स्वतः कसणे अपेक्षित असून, त्या विकता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. अशा जमिनींबाबत तक्रारी आल्याने चौकशी केली जाणार आहे. गोवारी शहीद दिनानिमित्त स्मारकाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करणार असून, अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
रामायण चित्रपटावरील विश्व हिंदू परिषदेच्या विरोधाबाबत नेमकी मागणी समजून घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवसुलीबाबत पुढील आठ महिने वसुली करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काही अवैध कंपन्या मायक्रो फायनान्सच्या नावाखाली वसुली करत असल्याच्या तक्रारी असून, अशा कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच बोअरवेल खोदण्यासाठी ७० हजार रुपयांपेक्षा अधिक दर आकारू नये आणि टँकरचालकांनीही अतिरिक्त पैसे घेऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांना त्यांच्या पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असून, या पक्षांतर्गत निर्णयांमध्ये भाजप हस्तक्षेप करणार नाही, अशी भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.



