Published On : Sat, Aug 29th, 2020

पूरग्रस्तांच्या घरांचे सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्या बावनकुळे यांची शासनाकडे मागणी

Advertisement

नागपूर: मध्यप्रदेश आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. मध्यप्रदेशात तर जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणे भरून ओव्हरफ्लो सुरु झाले आहे आणि जिल्ह्यातील पारशिवनी, सावनेर, रामटेक, कामठी मौदा या तालुक्यांमधील काही गावांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो लोकांची घरे पाण्यात असून हजारो हेक्टरवरील शेतकर्‍याची पिकेही पाण्याखाली गेली आहेत. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश महासचिव व पालकमँत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील पेंच व तोतलाडोह या दोन्ही जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. याशिवाय पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाणी जिल्ह्यातील गावांमध्ये घुसले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरावरील लोक मदत करीत आहेत. पण ही मदत अत्यंत अपुरी आहे. पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठ़ी पुरेशा बोटी उपलब्ध होत नाहीत. जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करावी व लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

काही गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. ड्रोनच्या माध्यमातून शासनाने याची माहिती करून घ्यावी व पूरग्रस्तांना बाहेर काढून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.