Published On : Sun, Feb 16th, 2020

विदर्भात उपलब्ध असणारा कच्चामाल व कौशल्य यांच्या आधारे या भागात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन होणे आवश्यक

Advertisement

नागपूर: विदर्भात उपलब्ध असणारा कच्चामाल व कौशल्य यांच्या आधारे या भागात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग स्थापन होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज नागपूरात केले . केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालया अंतर्गत सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योग विकास संस्था नागपुर यांच्यावतीने 14 ते 16 मार्च रोजी नियोजित खासदार औद्योगिक महोत्सवाबद्दल माहिती देण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. याप्रसंगी विकास सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विकास संस्थेचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार, खादी विकास व ग्रामोद्योग महामंडळाचे एस. कापसे, अॅग्रोव्हिजनचे संयोजक रवी बोरटकर उपस्थित होते.

विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रांमध्ये ‘स्फूर्ती’ योजनेअंतर्गत क्लस्टर मंजूर झाले आहेत. महात्मा गांधी ग्रामीण औद्योगीकरण संशोधन संस्था वर्धा द्वारे निर्मित सोलर चरख्यांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत असून खादी पासून तयार होणाऱ्या जीन्सच्या कापडाला सुद्धा मागणी मिळत आहे असे गडकरी यांनी सांगितले. वाशीम जिल्ह्यात बिब्ब्यावर आधारित क्लस्टर , गडचिरोली जिल्ह्यात अगरबत्तीचे क्लस्टर निर्माण होत आहेत आहे . अगरबत्तीच्या काड्यावरील आयात शुल्क वाढवल्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढेल, असेही त्यांनी सांगितले.

विदर्भात निर्माण होणाऱ्या मधापासुन ‘ हनी क्युब’ तयार करून त्यांना साखरेऐवजी पर्याय म्हणून वापरता येते .नुकत्याच स्पाईस जेट या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीने ‘हनी क्युबचा’ वापर सुरू केला आहे. खादीच्या डायल व बेल्टपासून घड्याळही खादी ग्रामोद्योग मंडळ व टायटन कंपनीद्वारे तयार करण्यात येत असून त्यांना चांगली मागणी मिळत असल्याच त्यांनी सांगितले.

नागपुरात आयोजित होणाऱ्या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या निमित्ताने केवळ नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील उद्योजकांना मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती होणार आहे . नवीन कल्पनांचे आदान-प्रदान होणार आहे ,असे गडकरी यांनी सांगितले. केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे ‘बँक ऑफ आयडियाज इनोव्हेशन रिसर्च’ या संस्थेद्वारे नवनवीन उद्योगाच्या कल्पना स्वीकारण्यात येणार आहेत तसेच सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योगाच्या उत्पादनांसाठी ‘भारतक्राफ्ट पोर्टल’ सुद्धा आता तयार होणार आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय डाक विभागाच्या सोबत समन्वय साधून सुक्ष्म लघु उद्योगाची उत्पादने देशभरात पोहोचवण्याचा सुद्धा प्रस्ताव असल्याचे ,त्यांनी सांगितले.

याप्रसंगी लघु मध्यम विकास संस्था नागपूरचे संचालक डॉ. पी.एम. पार्लेवार, यांनी हा तीन दिवसीय खासदार औद्योगिक दिवसीय महोत्सव नागपुरातील सिव्हिल लाईन स्थित डॉ.वसंतराव देशपांडे सभागृह, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र तसेच आमदार निवास या तीन ठिकाणी होणार असून त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, असे सांगितले.

यामध्ये राज्य व केंद्र शासनाचे सार्वजनिक उपक्रम, उद्योग-समूह, संशोधन तसेच शैक्षणिक संस्था या महोत्सवाप्रसंगी आयोजित एका भव्य अशा राष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतील. रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगार संधीच्या दृष्टीने क्लस्टर डेव्हलपमेंट, वेंडर डेव्हलपमेंट, बायर- सेलर मीट, आयात-निर्यात ,लॉजिस्टिक व सेवा क्षेत्र ,नाविन्यपुर्ण उपक्रम व स्टार्टअप ऑटोमोबाइल क्षेत्र, खाद्यान्न प्रक्रिया उद्योग या विविध विषयावर केंद्र व राज्य सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील अधिकारी तसेच केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम विकास मंत्रालयाचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या महोत्सवा दरम्यान सुमारे शंभर दालने राहणार असल्याची माहिती पार्लेवार यांनी यावेळी दिली.