
बारामती : राज्यातील बारामती आणि राहुरी या विधानसभा मतदारसंघांसाठी सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत आज सकाळपासून मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला असून संध्याकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. या निवडणुकांकडे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या लढती म्हणून पाहिले जात आहे.
बारामती मतदारसंघात मात्र वेगळेच भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत असून, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी सकाळी मतदान करत आपला हक्क बजावला.
मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरात जाऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, बारामतीतील नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे येत आहेत आणि ही निवडणूक फक्त राजकीय स्पर्धा नसून ‘दादा’ना दिलेली भावपूर्ण आदरांजली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, अनेक वर्षांपासून बारामतीकरांनी पवार कुटुंबावर विश्वास ठेवला आहे. आजही प्रत्येकाच्या मनात अजित पवार यांची आठवण कायम आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीची जाणीव सर्वांना होत आहे.








