Published On : Tue, Nov 10th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात रॉकेट, स्काय शॉट उडविण्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी; ४२ आगींच्या घटनांनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय!

Advertisement

इमारतींच्या गच्ची, बाल्कनी, बाजारपेठा, झोपडपट्ट्या आणि गर्दीच्या ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई; नियम मोडल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

नागपुरात रॉकेट, स्काय शॉट उडविण्यावर ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी; ४२ आगींच्या घटनांनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय!नागपूर : दिवाळीच्या उत्सवादरम्यान फटाक्यांमुळे आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नागपूर महापालिका प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात अवघ्या २४ तासांत ४२ हून अधिक आगीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर हवेत उडणारे रॉकेट, स्काय शॉट आणि तत्सम फटाके फोडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूर महापालिकेच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (यूडीएमए) ९ नोव्हेंबरपासून ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत हे निर्बंध लागू केले आहेत. यासंदर्भात प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश जारी केला आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूर शहरात आगीच्या घटनांनी चिंताजनक परिस्थिती निर्माण केली होती. अवघ्या एका दिवसात ४२ हून अधिक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्राथमिक निरीक्षणानुसार, हवेत उडविण्यात येणारे रॉकेट आणि स्काय शॉटमधून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या आगीच्या घटनांना कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. अशा फटाक्यांमधून निघणाऱ्या ज्वलंत ठिणग्या आसपासच्या इमारती, दुकाने आणि वाहनांवर पडल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. विशेषतः भंगार दुकाने, गोदामे, पेट्रोल पंप आणि ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेल्या ठिकाणी आग लागल्यास जीवित व वित्तहानी होण्याचा धोका अधिक आहे.

शहरातील संवेदनशील ठिकाणे प्रशासनाच्या रडारवर

नागपूर शहराची भौगोलिक रचना, वाढती लोकसंख्या, गगनचुंबी इमारती, दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्या आणि मोठ्या प्रमाणातील व्यावसायिक आस्थापना लक्षात घेता अशा फटाक्यांमुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील इमारतींच्या गच्ची, टेरेस, बाल्कनी, रेफ्युजी एरिया, अरुंद रस्ते, झोपडपट्ट्या, दाटीवाटीची निवासी क्षेत्रे, बाजारपेठा आणि वाहनतळ अशा ठिकाणी हवेत उडणारे फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

Advertisement

मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या अहवालातही या कालावधीत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत अग्निशमन विभागावर अतिरिक्त ताण निर्माण होण्याबरोबरच घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य दुर्घटना रोखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत निर्बंध; नियम मोडल्यास कारवाई

हे निर्बंध ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहेत. आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नागपूर पोलीस आयुक्तालय आणि महापालिकेच्या अग्निशमन विभागावर सोपविण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील लागू तरतुदींनुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दिवाळीच्या काळात घडलेल्या आगीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.