जागतिक बांबू दिनानिमित्त चर्चासत्र
·कृषि महाविद्यालयाचा उपक्रम
नागपूर : शेतकऱ्यांनी केवळ सोयाबीन, कापूस पिकावर अवलंबून न राहता इतर पर्यायी पिकांची लागवड करून पीक पद्धतीत बदल करणे काळाची गरज आहे. यासाठी वनशेती आणि विशेषतः बांबू लागवड हा उत्तम पर्याय ठरेल, असा विश्वास डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला.
जागतिक बांबू दिनानिमित्त नागपूर कृषि महाविद्यालयाच्या कृषि वनशेती संशोधन प्रक्षेत्र विभागामार्फत आज आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. खर्चे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, नागपूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. के. डी. ठाकूर, सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक एस. रमेश कुमार, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रकल्प प्रमुख डॉ. व्ही. एम. इलोरकर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते यावेळी ‘बांबूची व्यापारिकदृष्ट्या लागवड’ या माहितीपत्रिकेचे प्रकाशन झाले.
बांबू लागवडीमुळे शेतकऱ्यांना वनशेतीचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यावरण रक्षणाला सुद्धा यामुळे मदत होईल. बांबू पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी सध्या नागपूर येथील कृषि वनशेती संशोधन प्रक्षेत्रामध्ये संशोधन सुरु आहे. या संशोधनातून समोर येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. बांबू लागवडीपासून पाणी, अन्नद्रव्ये व्यवस्थापन आदी बाबींवर हे संशोधन आधारित असल्याचे डॉ. खर्चे यांनी सांगितले.
देशात सध्या बांबूचे उत्पादन कमी असल्याने अनेक उद्योगांसाठी बांबूची आयात करावी लागते. बांबू लागवड करताना कोणत्या प्रजातीच्या बांबूला अधिक मागणी आहे, कोणत्या उत्पादनासाठी कोणत्या प्रजातीचा बांबू आवश्यक आहे, याचा अभ्यास करून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मागणी असलेल्या बांबू प्रजातीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे डॉ. मायी यांनी सांगितले. तसेच यापुढे प्रत्येक जागतिक बांबू दिनी एका वर्षात बांबू लागवडीचे किती क्षेत्र वाढले, याचे मंथन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बांबू लागवड, कापणी, बांबूपासून तयार होणारी उत्पादने याविषयी संशोधन तसेच त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बांबू कापणीसाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे डॉ. तायडे यावेळी म्हणाले.
बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. आगामी काळात बांबूची मागणी वाढणार असल्याने शेतकऱ्यांना बांबू शेतीचे महत्व पटवून द्यावे लागेल. तसेच बाबू उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांच्यात समन्वय निर्माण करावा लागेल, असे एस. रमेश कुमार यांनी यावेळी म्हणाले.
प्रास्ताविकामध्ये डॉ. इलोरकर यांनी जागतिक बांबू दिनानिमित्त आयोजित चर्चासत्राची पार्श्वभूमी व स्वरूप सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत राऊत यांनी केले.