Published On : Sat, Jun 7th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बकरी ईदचा जल्लोष; विविध ठिकाणी उत्साहात नमाज अदा

Advertisement

नागपूर :शनिवार (दि. ७ जून) रोजी संपूर्ण शहरात बकरी ईद अर्थात ‘ईद-उल-अज्हा’ मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता मोमीनपुरा, काजीनगर, इमामवाडा, सतरंजीपुरा आदी भागांतील मैदानांवर सामूहिक नमाज पठण झाले. नमाज संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या.

बकरी ईद हा इस्लाम धर्मातील एक पवित्र आणि बलिदानावर आधारित सण मानला जातो. जिल्हाज महिन्याच्या दहाव्या तारखेला साजरा होणाऱ्या या सणानंतर जनावरांची कुर्बानी दिली जाते. कुर्बानीनंतर गरजूंमध्ये मांस वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली जाते.

शहरातील बाजारपेठांमध्ये यावेळी खरेदीला विशेष जोर होता. लहानग्यांनी नवे कपडे, खेळणी व मेव्यांची खरेदी करत ईदचा आनंद साजरा केला. अनेक घरांमध्ये खास ईदचे पारंपरिक जेवण तयार करण्यात आले होते.

या सणाचे धार्मिक महत्त्व हजरत इब्राहीम आणि त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्या कुरबानीशी संबंधित आहे. हज यात्रेच्या दरम्यान हा सण साजरा केला जातो आणि पुढील तीन दिवस ‘कुर्बानी’ची परंपरा पाळली जाते.

Advertisement

पोलीस प्रशासन व स्वयंसेवी संस्था यांच्यावतीने शांततेत व सुव्यवस्थेत ईद पार पडावी यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. संपूर्ण नागपूर शहरात बकरी ईद शांततेत व भक्तिभावाने साजरी झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.