Published On : Sat, May 13th, 2017

‘त्या’ विधानाबद्दल रामदेव बाबा यांच्या विरोधात अजामीनपत्र वॉरंट

Advertisement


नवी दिल्ली :
‘भारत माता की जय’ घोषणेवरुन केलेल्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबा यांच्याविरोधात हरयाणा न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मागील वर्षी रामदेव बाबा यांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हरिश गोयल यांनी रामदेव बाबा यांना समन्स बजावले होते.

हरयाणातील काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुभाष बत्रा यांच्या तक्रारीवरुन रामदेव बाबांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले.

‘भारत माता की जय बोलण्यास नकार देणाऱ्यांचा शिरच्छेद करण्यात यावा,’ असे विधान मागील वर्षी रामदेव बाबा यांनी केले होते. ‘भारत माता की जय या घोषणेवरुन रामदेव बाबा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल न्यायालयाने त्यांच्याविरोधात जामीनपत्र वॉरंट जारी केले आहे,’ असे काँग्रेस नेते सुभाष बत्रा यांचे वकील ओ. पी . चुघ यांनी म्हटले. याप्रकरणी १४ जुनला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश रामदेव बाबा यांना दिले आहेत.

‘कायद्यामुळे हात बांधले आहेत. अन्यथा भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या लाखोंची मुंडकी छाटली असती,’ असे वादग्रस्त विधान रामदेव बाबा यांनी मागील वर्षी हरयाणामध्ये बोलताना केले होते. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरुन सर्वच स्तरातून जोरदार टीका झाली होती. काँग्रेस नेते सुभाष बत्रा यांनी रामदेव बाबा यांच्या वक्तव्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. ‘पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला,’ असे बत्रा यांनी सांगितले.

रामदेव बाबा हरयाणा सरकारचे योग आणि आयुर्वेदाचे ब्रँड ऍम्बेसेडर आहेत. मागील वर्षी जाट आंदोलनाला संबोधित करताना लाखोंच्या समुदायासमोर रामदेव बाबांनी चिथावणीखोर विधान केले होते.