Published On : Wed, Apr 24th, 2019

कुख्यात गुंड बादल गजभिये याची बैधनाथ चौक जवळ हत्या

Advertisement

नागपुर – कुख्यात गुंड बादल गजभिये याच्यावर येथील बैद्यनाथ चौकात काही जणांनी धारधार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला. ही घटना बुधवारी साडेदहा वाजता घडली. पूववैमनस्यातून हा खुन झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात बादल गजभिये याची मोठी दहशत होती. आक्टोबर २०१५ मध्ये बादलचे वडिल राजू यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने चुनाभट्टी भागात २०१६ मध्ये सौरभ अलोणी याच्यावर हल्ला करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला होता. या घटनेचा बदला घेण्यासाठीच बादलचा खुन करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे इमामवाडा, रामबाग परिसरात पुन्हा गँगवॉर भडकले जाण्याची शक्यता आहे.

बादल गजभिये (वय २७) याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो बैद्यनाथ चौकातील कामगार भवनाच्या मागच्या बाजूला आला असताना तेथे हल्लेखोर आधीपासूनच दबा धरुन बसले होते. त्यांनी बादलला घेरले. त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच पडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी गर्दी केली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त रोशन राजतिलक आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी बादलला रुग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच बादल याचा मृत्यु झाला होता. घटनेनंतर अनेक लोकांची गर्दी तेथे जमली होती. मात्र, त्याची माहिती पोलिसांना खूप उशीरा मिळाली. सुमारे एक तास भर बादल याचा मृतदेह घटनास्थळी पडून होता