
नागपूर : माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले शेतकरी आंदोलन दुसऱ्या दिवशीही तीव्रतेने सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या तात्काळ आणि बिनशर्त कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) अडवून धरला आहे.
या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, नागरिक आणि वाहनचालकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, “जर शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली नाही, तर पुढचा टप्पा रेल्वे ट्रॅक जाम करणार असल्याचे कडून माध्यमांशी बोलताना म्हणाले आम्ही आता रस्त्यावरून थेट रेल्वे रुळावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी सरकारवर आरोप केला की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केलं जात आहे.” दरम्यान, प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांचे नागपूरातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










