Published On : Tue, Jul 23rd, 2019

डीजे बंद केल्याने नागपुरात पोलिसांवर हल्ला

नागपूर : डीजे बंद करायला लावल्याने संतापलेल्या असामाजिक तत्त्वांनी महालमध्ये पोलीस पथकावर हल्ला केला. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

नाईक रोड, महाल येथील साहिल भोसले यांनी रविवारी आपल्या जन्मदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत डीजे वाजविला जात होता. कोतवाली पोलिसाचे पथक रात्री १०.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. पार्टीत डीजे संचालक निखील मडावीसुद्धा उपस्थित होता. पोलिसांनी निखील, साहिल भोसले व त्याचा भाऊ हिमांशु भोसले तसेच त्यांच्या साथीदारांना डीजे बंद करण्यास सांगितले. यामुळे ते संतापले. त्यांनी डीजे बंद करण्यास नकार दिला. ते पोलिसांसोबत वाद घालू लागले.

गडबडीची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी अतिरिक्त पथक बोलावून घेतले. ते पाहून आरोपींनीसुद्धा २०-२५ साथीदारंना एकत्र केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. शिवीगाळ करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला. यामुळे परिसरात दहशत पसरली. पोलिसांनी अतिरिक्त पथकाच्या मदतीने निखील मडावीला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध दंगा, हल्ला, पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आदी गुन्हे दाखल केले. भोसले बंधू दबंग असल्याचे सांगितले जाते.