
नागपूर : शहरात आपली बस सेवेवर अज्ञातांनी अचानक हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. लकडगंज पोलिस स्टेशनच्या काही अंतरावर ही घटना घडली. बस वर्धमाननगरहून लकडगंजकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी हातोडीने बसच्या काचांवर जोरदार वार केले.
समोरच्या काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या खिडकीवर झालेल्या सलग हल्ल्यांमुळे बस चालक आणि प्रवासी घाबरून गेले. चालकाने तत्काळ बस साईडला घेत प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले.
घटनास्थळी हल्लेखोरांनी “हलबा एकता जिंदाबाद” असा मजकूर असलेले पत्रक फेकल्याची माहिती समोर आली आहे. मागील सहा दिवसांपासून हलबा समाजाचे आंदोलन सुरू असून या हल्ल्याचा त्याच्याशी संबंध आहे काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
लवकरच हल्लेखोरांचा माग काढून कठोर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. शहरात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









