Published On : Mon, Apr 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील अथर्व हत्याकांड प्रकरण;मिरवणुकीतून अपहरण, खंडणीच्या लालसेत अथर्वचा खून!

सीपी सिंगल यांची पत्रकार परिषदेत माहिती
Advertisement

नागपूर: गिट्टीखदान परिसरातील १४ वर्षीय अथर्व नानोरे अपहरण व हत्या प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. गुन्हे शाखा (डिटेक्शन) आणि गिट्टीखदान पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तीन तरुणांना अटक करण्यात आली असून, खंडणीसाठी हा संपूर्ण कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मिरवणुकीतील गर्दीचा गैरफायदा-
२ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेला अथर्व अचानक बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला; मात्र काहीच सुगावा लागला नाही. यानंतर पोलिसांत अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली.

खंडणीचा प्लॅन फसला, हत्या केली-
तपासात समोर आले की, आरोपींनी गर्दीचा फायदा घेत अथर्वला मिरवणुकीतून बाहेर काढले आणि त्याचे अपहरण केले. त्याच्या वडिलांकडून खंडणी उकळण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र, अथर्वने आरडाओरड सुरू केल्याने आरोपी घाबरले आणि त्याचा गळा आवळून खून केला.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न-
खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह पोत्यात भरून भरतवाडा रेल्वे क्रॉसिंगजवळील पुलावर टाकून दिला, जेणेकरून ओळख पटू नये आणि गुन्हा दडपला जावा.

Advertisement

प्रेत सापडल्याने तपासाला गती-
४ एप्रिल रोजी कळमेश्वर पोलिसांना एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी ओळख पटवली असता तो अथर्व असल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदनात गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

तांत्रिक तपासातून आरोपी जाळ्यात-
गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी जय रामगोपाल यादव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याचे साथीदार केतन उर्फ कुणाल साहू आणि आयुष साहू यांनाही अटक करण्यात आली.

आरोपींची माहिती-
जय रामगोपाल यादव (१९) – रा. ए.बी.एम रोड, गिट्टीखदान; भाजी विक्रेता, ऑटोचालक/इलेक्ट्रिशियन (मुख्य सूत्रधार)
केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२) – रा. कुतुबशाह नगर, गिट्टीखदान; व्यवसाय इलेक्ट्रिशियन
आयुष मोहन साहू (१९) – रा. इरोस सोसायटी, गोरेवाडा; व्यवसाय कबाडी काम
तिघांचाही कोणताही गुन्हेगारी भूतकाळ नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

मुद्देमाल जप्त-
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्यातून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे मिळाले.
दरम्यान खंडणीच्या लालसेतून एका निष्पाप मुलाचा जीव घेतल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, पोलिसांच्या तत्पर आणि अचूक तपासामुळे गुन्हेगारांना लवकरच अटक झाली.हीच या प्रकरणातील महत्त्वाची बाब ठरली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.