नागपूर : भाजपने नागपुरात आयोजित केलेल्या अटल महाआरोग्य शिबीरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. विजय कांबळे असे मृत पावलेल्या रुग्णाचे नाव आहे. त्याला शिबीर स्थळी चक्कर आल्यानंतर उपचारासाठी ऍम्बुलन्स न मिळाल्याने त्याच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व बांधकाम इमारत व इतर कामगार मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव यांनी नागपुरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अटल महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते. या शिबीराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
या शिबीराची जाहीरात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली होती तसेच सर्व सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांनी या शिबीराच्या जागी गर्दी केली होती.
महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन दुपारी 12 वाजताच्या सुमारास झाले. यानंतर केवळ अर्ध्या तासाने दक्षिण नागपुरातील विजय कांबळे व्यक्ती शिबीरस्थळी आली. त्याची तपासणी होण्यापूर्वी त्याला चक्कर आली व खाली पडला. त्याच्या उपचार सुरू झाले. त्याची स्थिती चिंताजनक झाल्याने तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी दवाखान्यात हलविण्याची सूचना केली. यासाठी ऍम्बुलन्स बोलाविण्यात आली. एक ऍम्बुलन्स आली खरी परंतु ती ऍम्बुलन्स बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या ऍम्बुलन्स बोलाविण्यात आली. यात बराच वेळ निघून गेल्याने विजय कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.
विजय कांबळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविण्यात आला.