– माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीसाठी नागपूर मनपाची निवड
नागपूर: महाराष्ट्र शासनाद्वारे माझी वसुंधरा २.० अभियान अंतर्गत आयोजित निसर्गातील पंचतत्वांवर आधारीत स्पर्धेत अमृत शहर गटामध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी दिनांक ०५ जून २०२२ रोजी नागपूर महानगरपालिकेचा मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. नागपूरकरांच्या वतीने हा सन्मान मा. उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वातील चमूने स्वीकारला. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता डॉ. श्वेता बनर्जी, सहाय्यक आयुक्त किरण बगडे आणि संदीप लोखंडे उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्पर्धेमध्ये अमृत गटात सर्वोत्तम कामगिरीसाठी नागपूर महानगरपालिकेची निवड करण्यात आली होती. रविवारी ५ जून रोजी सकाळी मुंबई मधील टाटा थिएटर, एन.सी.पी.ए. नरीमन पाँईंट येथे सर्व विजेत्या चमूंचा सन्मान सोहळा पार पडला.
वर्षभर पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत झालेल्या विविध कामांमुळे नागपूर महानगरपालिकेने या स्पर्धेत मुसंडी मारली.
मनपाच्या या यशामध्ये शहरातील विविध स्वयंसेवी संस्था व नागरिक यांचे सुध्दा मोठे योगदान आहे. त्यामुळेच मनपाला हे यश लाभल्याचे मनोगत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. दरम्यान भविष्यात देखील मनपाचा कार्यालेख असाच उंचावणार असल्याचेही ते म्हणाले.