नवी दिल्ली :अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. यापार्श्वभूमीवर पीएम मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईडीने पश्चिम बंगालमध्ये 3000 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा गरिबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले, तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले. माझी इच्छा आहे की, नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा. यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय. बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की, ईडीने जप्त केलेले 3000 कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधणार असल्याचे मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी आणि अमतृा रॉय यांच्यातील चर्चेची माहिती देताना भाजप नेत्यांनी सांगितले की, राज्यात नोकऱ्या देण्यासाठी तृणमूलने सुमारे 3,000 कोटी रुपये लाटले.
भ्रष्टाचाऱ्यांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे, सध्या हा पैसा ईडीकडे आहे. तो गरीब जनतेला परत केला पाहिजे. यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहे. एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उखडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे, तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचारी एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत. पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.