| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jul 7th, 2018

  मालमत्ता सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा!

  नागपूर: नागपूर शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा. यामध्ये आता कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. सर्वेक्षण झालेल्या सर्व मालमत्तांना वेळेत डिमांड पाठवा आणि यावर्षी दिलेल्या उद्दिष्टानुसार कर वसुली करा, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.

  नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात कर आकारणी व कर संकलन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, समितीचे उपसभापती व ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सदस्य यशश्री नंदनवार, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, भावना लोणारे, मंगला लांजेवार, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम उपस्थित होते.

  नागपूर शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम सायबरटेक कंपनीकडे देण्यात आले होते. कामाची गती लक्षात घेता अनंत टेक्नॉलॉजीला काही सेक्टरचे काम सोपविण्यात आले होते. या दोन्ही कंपनींसाठी आता सर्वेक्षणाची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. या काळात संपूर्ण मालमत्ताचे कार्य पूर्ण होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले. दरवर्षी कर वसुली ज्याप्रमाणे होते तशीच स्थिती यावर्षी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. वसुलीचे उद्दिष्ट मोठे आहे. त्यामुळे केवळ कर वसुलीसाठी स्वतंत्र सेल उभारण्याची सूचना त्यांनी केली. जेथे कर्मचारी कमी आहे, तेथे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली. यानंतर सभापती जाधव यांनी ३० जून पर्यंत दिलेल्या कर वसुली उद्दिष्टाचा झोननिहाय आढावा घेतला.

  स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी स्थायी समितीने झोन कार्यालयांना दिलेल्या उद्दिष्टांवर चर्चा केली. यावर्षी ५०९ कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वसुलीची विभागणी तिमाहीनुसार करण्यात आली आहे. या कार्यात कुठलीही हयगय चालणार नाही. ३० जून पर्यंत पहिल्या तिमाहीचे उद्दिष्ट साध्य झाले नाही. आता मागील तिमाही आणि पुढील तिमाही असे एकत्र उद्दिष्ट ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

  तत्पूर्वी सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनी २ मे रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांनुसार झालेल्या कामाची सद्यस्थिती सांगितली. संपूर्ण निर्देशांची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सायबरटेक आणि अनंत टेक्नॉलॉजीकडून प्राप्त झालेल्या डाटासंदर्भात ३२४४ आक्षेप प्राप्त झाले होते.

  त्यापैकी २६६७ निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरीत ५७७ वर कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंडेक्स क्रमांक असलेल्या जुन्या मालमत्तांची संख्या ५,२७,४८१ इतकी आहे. त्यापैकी ३,३९,२४९ मालमत्तांचे सर्वेक्षण झाले आहे. इंडेक्स क्रमांक नसलेल्या १,१७,०७९ मालमत्तांचे मिळून एकूण ४,५६,३३८ मालमत्तांचे सर्वेक्षण आटोपले असून त्यापैकी ४,०४,४०७ मालमत्तांचा डाटा प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  मालमत्ता कर अदा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच एक ‘ॲप’ लॉन्च करण्यात येणार आहे. या ॲपचे सादरीकरण यावेळी समितीपुढे करण्यात आले. बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त, कर निर्धारक उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145