नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम नागपुरातील महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आई आणि पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.
पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केले. ही गोष्ट एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही, असे मी कालच म्हटले असल्याचे फडणवीस म्हणाले. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी बिटकॉईन खरेदी केल्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्र्यांनी ही गंभीर बाब असून त्याची चौकशी व्हायला हवी असे सांगितले.
विनोद तावडेंच्या पैसे वाटप प्रकरणाबाबत फडणवीस म्हणाले की, तावडेंनी पैसे वाटले नाहीत किंवा त्यांच्याकडे पैसेही सापडले नाहीत. त्यांच्यावर विरोधकांकडून खोटे आरोप करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओबाबत ते म्हणाले की, हा विषय अतिशय गंभीर आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.