लाईक्स, कमेंटमधून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न, फेक एजन्सीचाही सुळसुळाट.
नागपूर: महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुकांनी सोशल मिडियावरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्याचे नगरसेवक किंवा संभाव्य उमेदवाराविरुद्ध नागरिकांचा कौल घेण्यासाठी इच्छुकांकडून सोशल मिडियावर पोस्ट टाकल्या जात आहे. एवढेच नव्हे स्वतःची सकारात्मक बाजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेक लाईक्स, कमेंट खरेदीसाठीही इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
गेल्या दहा वर्षात झालेल्या निवडणुकींमध्ये सोशल मिडियाची मोठी भूमिका असून यंदा महापालिका निवडणुकीतही याच व्यासपीठावरून धुरळा उडणार आहे. सध्याच्या नगरसेवकांबाबत नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याच प्रभागातील, पक्षातील इच्छुकांनी काही एजन्सीला हाताशी धरून ‘ब्रॅकेट सर्वे’ सुरू असल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी सांगितले. यातून नागरिकांचे सध्याच्या नगरसेवक किंवा इतर संभाव्य उमेदवाराबाबत नागरिकांचे मत जाणून घेण्यासोबतच स्वतःची प्रतिमाही मोठी केली जात आहे. सोशल मिडियावरील नागरिकांचे एखाद्याबाबत मत, स्वतःबाबतचे मत यावर अहवाल तयार करून पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी जुगाड लावला जात आहे.
प्रभागातील नागरिकांचे नाव, वय, लिंग, पता, जात, आर्थिक स्तर व इतर माहिती मिळविण्यासाठी डेटा खरेदीसाठी इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहे. ज्यांना डेटा खरेदीचा अनुभव नाही, अशांनी विविध सोशल मिडिया वापरकर्त्याच्या पोस्ट, कमेंटवरून वय, शिक्षण, व्यवसाय, नोकरीबाबत माहिती घेणे सुरू केले आहे. त्यांच्याशी सोशल मिडियावरच संवाद साधन्यात येत आहे. यातून सोशल मिडिया वापरकर्त्यांच्या उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेण्यात येत आहे किंवा एखादा मुद्दा, घोषणा त्यांच्याकडून माहिती करून घेण्यात येत आहे.
इच्छुकच नव्हे तर नगरसेवकही सोशल मिडियावर सक्रीय झाले असून आधीच्या अपूर्ण मागण्या, तक्रारीवरून नागरिकांचे लक्ष दूर करण्यासाठी नवनवीन उपक्रम, त्यासंदर्भातील वृत्त पोस्ट करण्यात येत आहे. अनेकदा परस्परविरोधी विषय जाणीवपूर्वक पोस्ट करून भ्रम निर्माण केला जात असल्याचेही पारसे म्हणाले.
‘पे फॉर पोस्ट’ डमी लाईक्स, कमेंट इत्यादीच्या माध्यमातून कृत्रिम लोकप्रियता मिळवली जात आहे. संभाव्य विरोधी उमेदवाराबाबत किंवा नगरसेवकाबाबत नकारात्मक पोस्ट तयार करण्यासाठी विद्यार्थी, बेरोजगारांचा आधार घेतला जात आहे. ‘पे फॉर पोस्ट’ तत्त्वावर त्यांना काम दिले जात असून व्हाट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणे, व्हिडीओ तयार करण्यासाठी त्यांना मोठे मानधन देण्यात येत आहे.
स्वतःची प्रतिमा तयार करण्यासाठी आता फेक सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर्स उपलब्ध आहे. ते लाईक करतात, पोस्टवर कमेंट करतात. निवडणुकीत हा व्यवसाय मोठा आहे. भाड्याने फ्लॅट घेऊन अत्याधुनिक यंत्रणेचे कॉल सेंटरही उघडले जाईल. यातून अनधिकृत बल्क मेसेजचा मारा केला जाईल. त्यामुळे मतदारांनी जास्त जागृत व सावध राहण्याची गरज आहे.
– अजित पारसे, सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.webnagpur.com