नागपूर: एशिअन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) च्या ६-सदस्यीय पथकाने नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. आपल्या तीन दिवसिय दौऱ्यात पथकाने नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या पूर्णत्वास आलेल्या टप्पा-१ ची पाहणी केली तर टप्पा-२ संबंधी विस्तृत माहिती घेतली. प्रकल्पांतर्गत असलेल्या विविध भागांना त्यांनी भेट दिली, मेट्रोने प्रवास केला आणि प्रवाश्यांशी संवाद साधत त्यांची मत जाणून घेतली.
फिलिपाइन्सची राजधानी असलेल्या मनिला शहरात एडीबी चे मुख्यालय असून या बँकैची स्थापना १९६६ मध्ये झाली होती आणि त्याचे ६८ सदस्य आहेत. नागपुरात दाखल झालेल्या पथकात श्री. मुकुंद सिन्हा, श्री. शरद सक्सेना, श्री. कौशल साबू, श्रीमती मारिया लारिन, श्रीमती सुवा लक्ष्मी सेन व श्रीमती यातोमी यांचा समावेश होता. एशिया आणि पॅसिफिक भागातील देशांना हि बँक आर्थिक मदत देते.
आपल्या तीन दिवसाच्या दौऱ्याचा भाग म्हणून एडीबी पथक पहिल्या दिवशी मेट्रो भवन येथे दाखल झाले. महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-1 आणि टप्पा-2 बाबत सविस्तर माहिती दिली. बैठकीत प्रवासी सुविधा, फीडर सेवा, सुरक्षा, सौरऊर्जा, पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बँकेच्या सदस्यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्याशी चर्चा केली. डॉ.दीक्षित यांनी महामेट्रोकडून सुरू असलेल्या टप्पा-२ च्या सुरुवातीच्या कामांची माहिती दिली.
या पथकाने टप्पा-२ अंतर्गत असलेल्या विविध स्थानकांना भेट दिली तसेच मेट्रोने प्रवास करत त्या दरम्यान प्रवासी आणि नागरिकांशी चर्चा केली. मेट्रो स्थानकांवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. नागपूर शहरात उपलब्ध असलेल्या जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधेबद्दल मेट्रो प्रवाशांनी आनंद व्यक्त करताना मेट्रोच्या आगमनामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडल्याचे सांगितले. बँकेच्या टीमने फेज-2 साठी नियोजित मेट्रो मार्गांची पाहणी केली.
ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन ते कन्हान नदी पूल, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर, लोकमान्य नगर ते हिंगणा आणि खापरी ते बुटीबोरी या मेट्रो मार्गांची पाहणी केली. सदस्यांची टीम हिंगणा मार्गावर असलेल्या लिटल वूड येथे पोहोचली. यावेळी अधिकाऱ्यांनी पर्यावरण क्षेत्रात महामेट्रोने केलेल्या कामाची माहिती दिली. टीमने सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनच्या कामकाजाचे आणि स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे कौतुक केले. खापरी मेट्रो स्थानकावरील प्रवाशांचा सुविधांची माहिती घेतली.
एडीबी सदस्यांनी प्रवाशांकरता असलेल्या ई-रिक्षा, बससेवा, फीडर सेवेसाठी उपलब्ध असलेल्या ई सायकलबाबत माहिती घेतली. पथकातील सदस्यांनी स्वतः सायकल चालवून या सेवेचा अनुभव घेतला.