Published On : Wed, Jul 24th, 2019

निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम सनियंत्रण प्रमाणीकरण समितीचे कार्य प्रभावी – अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समितीने रामटेक व नागपूर मतदारसंघात सोशल मिडियासह दृकश्राव्य व वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या पेडन्यूज सह भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे केलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे निवडणुकीची प्रक्रिया अत्यंत सुलभपणे राबविणे शक्य झाले असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणीकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समितीच्या सदस्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी समितीचे नोडल अधिकारी पी.जे. गडेकर, समितीचे सदस्य पोलीस उपायुक्त व सायबर सेलच्या प्रमुख श्रीमती श्वेता खेडकर, जेष्ठ पत्रकार राहूल पांडे, जनसंवाद विभागाचे प्रा. मोईज हक, पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक शशिन राय, दूरदर्शनचे कार्यकारी अधिकारी अतुल भुसारी, आकाशवाणीचे सहाय्यक संचालक मनोज सोनोने, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, भाषा विभागाचे सहाय्यक संचालक हरिष सूर्यवंशी, सायबर तज्ज्ञ महेश माखेजा आदी यावेळी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी करताना समाज मनावर प्रभाव टाकणाऱ्या विशेषत: वृत्तपत्र, दृकश्राव्य माध्यम तसेच सोशल मिडियावरुन होणाऱ्या प्रचारासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने जिल्हास्तरावर माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार विविध माध्यमांवरुन प्रचार व प्रसारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसिध्दी साहित्याचे प्रमाणिकरण समितीमार्फत करण्यात आले होते.

Advertisement

या समितीने विविध माध्यमांच्या सहकार्याने जनजागृती करुन आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. यामध्ये सोशल मिडियाचा वापर काळजीपूर्वक करावा, कोणतेही निवडणूकविषयक पोस्ट फारवर्ड करतांना घ्यावयाची काळजी, या वापरामुळे समाज मनावर विपरित परिणाम होणार नाही या बाबतही उमेदवारासह मतदारांमध्ये जागृती निर्माण केल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

उमेदवारांनी प्रचार साहित्याचे प्रमाणीकरण करुनच मतदारांपर्यंत पोहचवावे. तसेच समाज माध्यमे हाताळतांना काय करावे, काय करु नये, याबाबतही जिल्हा माध्यम प्रमाणीकरण समितीने उत्कृष्ट काम केले आहे. लोकसभेनंतर विधान सभेच्या निवडणूक काळातही पेड न्यूजसह विविध समाज माध्यमांचा वापर कसा करावा, या संदर्भात या समितीचे कार्य निश्चितच मार्गदर्शक ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.