मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली. काँग्रेस सोडल्यानंतर ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाणा आले आहे. राजीनाम्या दिल्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही, राजीनामा देण्यामागे कुठलीही व्यक्तीगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. एक ते दोन दिवसांत यासंदर्भात माहिती देईल.
तुम्ही भाजपात जाणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी चव्हाण यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, “प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे, आता मला वाटलं अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून राजीनामा दिला आहे.पक्षांतर्गत नाराजीच्या चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले, मला कोणतीही पक्षांतर्गत गोष्ट जाहीर करायची नाही, किवा उणीदुनी सांगायची नाहीत. कोणत्याही काँग्रेसच्या आमदाराशी माझं काही बोलणं झालेलं नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपासहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही, असेही चव्हाण म्हणाले.