Published On : Sat, Jul 31st, 2021

कृत्रिम दरवाढ व भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Advertisement

– जीवनावश्यक वस्तूंच्या अनावश्यक भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची जिल्हा ग्राहक समितीची मागणी

नागपूर : शासनाच्या निर्बंधाचा गैरफायदा घेऊन कोरोना काळात जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ होत असेल व अनावश्यक दरांमध्ये वस्तूंची विक्री होत असेल, तर यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत वजनमापे तसेच अन्न व औषध विभागाने याकडे लक्ष वेधण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक ऑनलाइन पद्धतीने आज घेण्यात आली. यावेळी अनेक सदस्यांनी कोरोना संसर्ग काळामध्ये मर्यादित वेळेत ग्राहकांना सामान खरेदी करायचे असल्यामुळे मनमानी दरवाढ व भेसळ केलेले पदार्थ विक्री केले जात असल्याचे ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी उपस्थित वैधमापन विभाग व अन्न औषधी विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात त्यांनी निर्देश दिले. तसेच नागरिकांनी अशा समस्यांची लेखी तक्रार, संबंधित विभागाकडे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केली आहे.

कोविड प्रोटोकॉल पुढील काही दिवसात शिथील होण्याची शक्यता आहे. अशावेळी निर्बंध घातलेली दुकाने, मॉल उघडण्यात येतील, यावेळी संग्रही असणाऱ्या पदार्थांची विक्री होणार नाही. या संदर्भात काळजी घ्यावी. तसेच दुकानदारांनी देखील अपायकारक ठरतील अशा वस्तूंची विक्री करू नये, असे त्यांनी आवाहन केले. गेल्या काही दिवसात तेलामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. यापूर्वीच्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्येही सदस्यांनी तेलातील भेसळीबाबत लक्ष वेधले होते.

त्यामुळे यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. परिषदेच्या सदस्यांनी या काळामध्ये जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला तसेच खाद्यपदार्थ चढ्याभावाने विकल्या जात असल्याबाबत तक्रारी केल्या. कृत्रिम महागाई कोरोना काळात वाढत असल्याचे लक्षात आणून दिले. तसेच ग्राहक संरक्षण समितीच्या बैठका प्रत्यक्ष व्हाव्यात, सर्वांना ओळख पत्र मिळावेत, अशी विनंती देखील केली.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, यांनी गेल्या बैठकीमध्ये कोविड संदर्भातील उपचारात अनावश्यक बिलाची आकारणीबाबतच्या तक्रारी आले असल्याचे सांगितले. यासंदर्भात महानगर पालिका मार्फत कारवाई करण्यात आली याबद्दल सदस्यांनी समाधान व्यक्त केल्याचे सांगितले.

ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी प्रसिद्धी अभियान राबविण्याचे, यासाठी सामाजिक संघटना व युवक संघटनांना कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्याबाबतच्या सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मिलिंद शेंडे, पोलीस उपअधीक्षक संजय पुरंदरे, वजनमापे विभागाचे बानाफर, अन्न व औषधी विभागाचे डॉ. पी. एम. बल्लाळ, सदस्य शामकांत पात्रीकर, रेखा भोंगाळे, मनोहर रडके, अर्चना पांडे, गणेश इनाके, रवीकांत गौतमी, कमल नामपल्लीवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मृदुला मोरे उपस्थित होते.