मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीसांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, मला ठार मारण्याचे कारस्थान होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. जरांगे यांनी फडणवीसांबद्दल जातीवाचक भाषाही वापरली. त्यानंतर, भाजपा आमदार व नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत आज याच मुद्द्यावरून गदारोळ पाहायला मिळाला.
भाजप आमदारांनी जरांगेंना अटक करण्याची मागणी केली आहे. धानपरिषदेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरुन माजी विरोधी पक्षनेते आणि आमदार प्रविण दरेकरही चांगलेच आक्रमक झाले होते.भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. यात आमदार रोहित पवारांचाही हस्तक्षेप असल्याचे बोलले जात आहे.