नागपूर —महाराष्ट्र सरकारच्या ठेका पद्धतीने परिचारिका भरती करण्याच्या धोरणाचा निषेध करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सातव्या वेतन आयोगातील विसंगती आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागातील निर्णयांविरोधात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सेसने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या मेयोत सुमारे १००० नर्सेस तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात २०० ते २५० नर्सेस संपात सहभागी झाल्या आहेत. एकूणच नागपूरमध्ये १२०० हून अधिक नर्सेस काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे.
नर्सिंग सेवेतील वेतन विसंगती, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी योग्यप्रकारे न होणे आणि ठेका पद्धतीतील भरती या मुख्य मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. १५ आणि १६ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील नर्सेसनी निदर्शने केली होती. त्यानंतर काल एक दिवसाचा काम बंद आंदोलन करण्यात आले आणि आजपासून राज्यभरातील नर्सेस बेमुदत संपावर गेल्या आहेत.
या संपामुळे नागपूरच्या दोन्ही प्रमुख रुग्णालयातील आरोग्यसेवा ठप्प झाली असून, शस्त्रक्रियांच्या वेळा पुढे ढकलण्यात येत आहेत. नागपूर मेयोचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले की, “परिचारिका संपावर गेल्यामुळे वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला आहे. इतर रुग्णालयांतून नर्सेस मागवण्यात आल्या असून, तात्पुरते पर्याय शोधले जात आहेत. मात्र काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत.”
राज्यभरात सुमारे २०,००० हून अधिक परिचारिका या संपात सहभागी असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास रुग्णसेवा आणखी संकटात सापडण्याची शक्यता आहे. परिचारिका संघटना सरकारकडून त्वरित तोडगा काढण्याची मागणी करत आहेत.