Published On : Fri, Jan 5th, 2018

जलयुक्त शिवार अभियानाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नागपूर: सर्वांसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केल्यामुळे विभागातून प्रथम आल्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा ज्योतीबा फुले जलमित्र पुरस्कार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळाला आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वीकारला आहे.

मृद व जलसंधारण विभागातर्फे महात्मा ज्योतीबा फुले जलमित्र पुरस्काराचे राज्यस्तरीय वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथील एका शानदार समारंभात झाले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्य सचिव सुमित मलिक, तसेच मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ दवले यावेळी उपस्थित होते.

नागपूर जिल्हयात सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत 313 गावे जलपरिपूर्ण झाले असून या अंतर्गत 55 हजार 250 कामे पूर्ण झाले आहेत. जलसंधारण विभाग, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग, जलसंपदा, स्थानिकस्तर, ग्रामपंचायत, वन विभाग आदी विभागांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये जिल्हयात विविध कामे पूर्ण केली आहेत. जिल्हयात सरासरी 80 टक्केपेक्षा कमी पाऊस पडू नये सरासरी दीड मीटरपर्यंत भूजल पातळी वाढ झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे पिकांना सर्वेक्षित सिंचनासोबतच 2016-17 या वर्षात शेतकऱ्यांनी दुसरे पीक घेतले होते. जिल्हयात सीएसआर निधीमधून विविध कामे पूर्ण झाली तसेच लाभार्थ्यांमार्फत 350 पेक्षा जास्त शेततळयांची कामे पूर्ण झाली 2015-16 या वर्षात डीप-सीसीटीची कामे वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात आले होते. या उल्लेखनिय कामाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच प्रधानमंत्री कार्यालयातर्फे सुध्दा घेण्यात आली होती. विभागात सर्वोत्कृष्ट जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमबजावणीसोबतच जलपरिपूर्ण झालेल्या गावांमध्ये भूजल पातळीत झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या पीकांना संरक्षण मिळाले असल्याची जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.

जिल्हयातील विभाग प्रमुखांनी जलयुक्त शिवार अभियानामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामामुळे महात्मा ज्योतीबा फुले जलमित्र पुरस्काराने जिल्हयाचा गौरव झाला आहे.