Published On : Tue, Jan 28th, 2020

ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कमुळे नागपूरच्या लगत असणारी शहरे ‘सॅटलाईट टाऊन’ म्हणून विकसित होतील

-केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी

नागपूर :mनागपूर मेट्रो रेल्वे सोबतच ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्कमुळे नागपूरच्या लगत असणा-या भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा ही शहरे नागपूर शहराशी जोडले जाऊन ते एक ‘सॅटलाईट टाऊन’ म्हणून विकसित होतील, अशी आशा केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केली.

महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो एक्वा लाईन या 18.5 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांच्या द्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नागपूरातील हिंगणा रोड स्थित सुभाष नगर मेट्रो रेल्वेस्थानकात पार पडले त्यावेळी मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. केंद्रीय शहर विकास मंत्रालयाचे सचिव डी. एस. मिश्रा, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, गृह मंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस, नागपुर महामेट्रोचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

मेट्रोचे कोचेस हे भारतीय रेल्वेच्या ट्रॅकवर तसेच सिग्नालींग सिस्टीमवर संचालित करून यांचा वेग 120 किलोमीटर प्रति तास राहील असे ब्रॉड गेज रेल्वे नेटवर्क प्रस्तावित आहे. सदर नेटवर्कचा रोलिंग स्टॉक तसेच पुणे मेट्रोचा रोलिंग स्टॉक जर वर्ध्याच्या सिंधी येथील ड्रायपोर्ट मध्ये निर्माण झाला तर या रोलिंग स्टॉकच्या उत्पादन खर्चामध्ये कपात होईल, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. मेट्रोच्या टप्पा 2 मध्ये हिंगणा कामठी बुटीबोरी पर्यंत मेट्रो विस्तारणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.


या कार्यक्रमामध्ये केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी सुद्धा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून सहभागी झाले होते. ते म्हणाले की ,नागपूर हे देशातील पाचवे सर्वात वेगाने वाढणारे शहर असून उत्तर-दक्षिण ऑरेंज लाईन व पूर्व-पश्चिम एक्वा लाईन असे सुमारे 25 किलोमीटर एवढे रेल्वे नेटवर्क आता नागपूरात संचलित झाले आहे. यासोबतच देशभरात एकूण 680 किलोमीटर मेट्रो रेल नेटवर्क कार्यान्वित झाले आहे.

या रेल्वे लाईन चे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्‌धव यांनी नागपूरकर तसेच राज्यातील जनतेला मेट्रोच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वत:ही स्वीकारण्याचे आवाहन केले जेणे करून केवळ भारतच नव्हे तर जगभरातील पर्यटक व प्रवाशांनाही ही मेट्रो आकर्षित करेल. नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.

केंद्रीय शहर विकास विकास मंत्रालयाचे सचिव डी एस मिश्रा यांनी नागपूर मेट्रो चे काम हे ऑगस्ट 2014 मध्ये मंजूर झाले होते व जून 2015 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली .या प्रकल्पाला एकूण 8 हजार 680 कोटी रुपये खर्च आला.मार्च 2019 मध्ये उत्तर-दक्षिण असणारी ऑरेंज लाईन सुरू झाली , अशी माहिती दिली. पंतप्रधानांनी या प्रकल्पाला दिलेल्या एका शुभेच्छा संदेशाचे वाचनही त्यांनी याप्रसंगी केले.

सर्व मान्यवरांनी व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून मुख्यमंत्री व हरदीपसिंग पुरी यांनी अ‍ॅक्वा लाईनच्या मेट्रोला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.या उद्घाटन समारंभाला लोकप्रतिनिधी महा मेट्रोचे अधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागपूरच्या अंबाझरी तलावावरून जाणारी अ‍ॅक्वा लाईन मेट्रो ही च्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणार आहे. यामुळे हिंगणाच्या औद्योगिक क्षेत्रातून व शहरातील बाहेरच्या भागातून येणाऱ्या नागरिकांना प्रवासी सुविधा उपलब्ध झाली आहे. लोकमान्य नगर ते सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन दरम्यान असणा-या या मेट्रोरेल लाईनमध्ये 6 स्टेशन असतील. नागपूर मेट्रो सौर ऊर्जेचा 65% वापर करणारी हरित मेट्रो असून हे मेट्रो नेटवर्क शहरात आता 24.5 किलोमीटर कार्यरत झाले आहे.