Published On : Mon, Feb 8th, 2021

गडचिरोली जिल्ह्याच्या 275 कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक अराखडयास मंजुरी

– जिल्ह्याच्या अतिरिक्त मागणीचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत घेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली: पुढील वर्षीच्या ग्रामीण विकासासाठी जिल्ह्याच्या ठरवलेल्या 187 कोटी 5 लक्ष रुपयांच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त 88 कोटी रुपये मंजूर करीत 275 कोटी रुपयांच्या आराखडयास मान्यता देत आहे. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली 320 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणी बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम करण्यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्याची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.

बैठकीला नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, वित्त व नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके उपस्थित होते.

अतिरीक्त मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईला बैठक घेऊन चर्चा करू आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज 88 कोटी अतिरिक्त निधी देऊन 275 कोटी रुपयांपर्यंत मान्यता देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी क्षेत्रनिहाय लागणाऱ्या अतिरिक्त निधीची कारणासाहित माहिती दिली. या बैठकीला जिल्ह्यातील अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.