नागपूर :गेल्या अनेक दिवसांपासून नागपूर पोलीस आयुक्तालयात नवे आयुक्त नियुक्तीच्या चर्चा सुरू असतानाच गृह विभागाने बुधवार नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची बदली केली. आता रविंद्र सिंगल यांची नागपूरचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती –
पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सप्टेंबर २०२० रोजी नागपुरात रुजू झाले होते. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. मात्र आता त्यांची बदली होणार असल्याची चर्चा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यांच्या जागी आता नागपूर पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्याला देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता अमितेश कुमार यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत डॉ. रवींद्र सिंघल-
नागपूर शहराच्या नव्या पोलीस आयुक्तांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. रवींद्र सिंघल हे नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असतील. ते अमितेश कुमार यांची जागा घेतील. डॉ.रवींद्र हे सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक, वाहतूक, मुंबई म्हणून कार्यरत आहेत. सिंघल यांनी यापूर्वी 2010 मध्ये नागपूर शहर पोलिसांत सेवा बजावली होती. एवढेच नाही तर ते मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात रेल्वे पोलिस अधीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. 2010 ते 2013 पर्यंत सिंघल यांनी दक्षिण मध्य क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्राचे संचालकपदही भूषवले आहे. आता नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली आहे.
‘या’ अधिकाऱ्यांच्याही झाल्या बादल्या –
गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.पुण्याचे पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभागाच्या नामदेव चव्हाण यांचीविशेष पोलीस महानिरीक्षक, रा.रा. पोलीस बल, नागपूर येथे बदली झाली आहे. तर नागपूरचे पोलीस उप आयुक्त मुमक्का सुदर्शन यांचीपोलीस अधीक्षक म्हणून चंद्रपूर येथे बदली झाली आहे. नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संदीप पाखले यांची यांची पोलीस अधिक्षक विशेष कृती गट, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर येथे बदली झाली आहे. तर मुंबईचे सहायक पोलीस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, पोलीस महासंचालक रमेश धुमाळ यांची नागपूर ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.