Published On : Mon, Jun 7th, 2021

इनडोअर हॉलमध्ये सरावाची परवानगी दयावी तभानेची आयुक्तांना अपील

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विशेष समिती सभापती प्रमोद तभाने यांनी इनडोअर हॉलमध्ये सरावाची परवानगी देण्याची मागणी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांना केली. आयुक्तांना देण्यात आलेल्या एका निवेदनात त्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या लेव्हल-१ अंतर्गत नागपूर शहरात असलेले लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतलेला आहे.

या निर्णयानुसार सोमवार (७ जून) पासून नागपूर मनपा प्रशासनाने फक्त बाहय मैदानावर सरावाची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून इनडोअर हॉलमध्ये सराव करण्यापासून वंचीत असलेले बॅडमिंटन व टेबल टेनीस पटूंना पून्हा सरावापासुन वंचीत ठेवण्यात आलेले आहे.

या निर्णयामुळे नागपूर शहरातील अनेक क्रिडापटूंनी माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून यातून दिलासादायक मार्ग काढण्याबाबत विनंती केलेली आहे. ज्याप्रकारे आऊटडोअर मैदानावर सरावास परवानगी देण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे कोव्हिड – १९ च्या सर्व नियमावलींचे पालन करण्याचे निर्देश देवून नागपूर शहरातील इनडोअर हॉलमध्ये सुध्दा सरावाची परवानगी देण्यात यावी. मनपा आयुक्तांनी या विषयावर पुढच्या आठवडयात योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर उपस्थित होते.