Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Mar 27th, 2019

  वीज यंत्रणेजवळ कचरा जाळू नका महावितरणचे नागरिकांना आवाहन

  नागपूर: वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

  शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस ऊनाचा पारा वाढत असल्याने कच–यास आगी लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.

  वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेचे तापमान अश्या आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फ़टका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कच–याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागपूर शहरातील तसेच जिल्हयातील नागरिकांनी उघडयावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सुचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

  शॉर्ट सर्कीटचाही धोका
  घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्कीटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिकल आउटलेट्स किंवा एक्स्टेंशन कॉड ओव्हरलोड झाल्यास याशिवाय वायरिंगमध्ये कित्येक वेळी सैल जोड वा कनेक्शन असतात, कालांतराने हे जोड काबरेनाइज होतात.

  कधी कधी हे जोड सैल असल्यामुळे व त्याला घट्ट इन्सुलेशन न केल्यामुळे उंदीर, पाल आदी या वायर कुरतडतात व हळूहळू त्यामुळे स्पार्किंग सुरू होते व प्रसंगी शॉर्ट सर्कीट होऊन आग लागण्याची संभावना असते, अश्यावेळी प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा, त्यापूर्वी याची सुचना अग्निशमन विभागाला देण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

  नॅशनल इलेक्ट्रिक कोड 2011 प्रमाणे वायरिंगचे आयुष्य 20 ते 25 वर्षे असावे असे निर्देश आहेत. घरगुती वायरिंगला 20 वर्षे झाल्यावर ग्राहकाने एखाद्या मान्यताप्राप्त किंवा महाराष्ट्र शासनाचा अनुज्ञप्तीधारक विद्युत कंत्राटदाराकडून आवश्यक त्या चाचण्याकरून घेत त्याच्या सुचनेनुसार वयरिंग बदलून घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145