Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 6th, 2018

  खोदकाम करतेवेळी महावितरणला विश्वासात घेण्याचे आवाहन


  नागपूर: नागपूर मेट्रोच्या कामामुळे महावितरणला भर उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड ताप सहन करावा लागत आहे. महावितरणला कुठलीही पुर्वसुचना न देता शहरात मेट्रोकडून सुरु असलेल्या खोदकामांमुळे भुमिगत वीज वाहिन्या तुटण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. याचा फ़टका महावितरणसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसत असून अंधार आणि उकाड्यामुळे वीजग्राहक मेताकुटीस आले आहेत.

  गुरुवारी रात्री भारतीय खाद्य निगम परिसरास वीज पुरवठा करण्याऱ्या भुमिगत वाहिनीला अजनी चौक येथे मेट्रो आणि ओसीडब्लूच्या खोदकामांचे वेळी तडा बसल्याने सुमारे अडीच हजार ग्राहकांचा वीज पुरवठा रात्री ८ वाजता खंडित झाला. रात्रीची वेळ असल्याने बिघाड दुरुस्त करणे शक्य नसल्याने पर्यायी मार्गाने वीज पुरवठा घेऊन ग्राहकांना त्वरीत दिलासा देण्यात आला होता, या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटे महावितरणकडून युद्ध पातळीवर सुरु करण्यात येऊन सकाळी १० वाजेपर्यंत येथील वीज पुरवठा नियमित वाहिनीवर स्थानांतरीत करण्यात आला.

  याशिवाय शुक्रवारी मुंजे चौकात पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास परत एकदा मेट्रोच्या खोदकामाचा फ़टका महावितरणच्या भुमिगत वीज वाहिनीला बसला. बिघाडाची माहिती मिळताच बर्डी शाखा कार्यालयाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि पहाटेच तेथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.

  खोदकाम करतेवेळी महावितरणला विश्वासात घ्या
  नागपूर शहरात आज मेट्रो, पाणी पुरवठा, महानगरपालीका, सुधार प्रन्यास, दुरसंचार विभाग यांसारख्या अनेक विभागांमार्फ़त मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु असून त्यासाठी अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या ड्रील मशिन्सच्या सहाय्याने खोदकामही करण्यात येत आहे, या खोदकामांमुळे महावितरणच्या भुमिगत वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून सोबतच अविस्कळीत वीजपुरवठ्यामुळे ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत असल्याने, अश्या खोदकामाची महावितरणला पुर्वसुचना दिल्यास होणारे नूकसान टळून ग्राहकांनाही त्रास होणार नाही, असे महावितरणतर्फ़े स्पष्ट करण्यात आले आहे.

  महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात महावितरणची बहुतांश वीज वितरण यंत्रणा ही भुमिगत आहे, या यंत्रणेचा नकाशाही महावितरणकडे उपलब्ध आहे, यामुळे खोदकाम करतेवेळी महावितरणला पुर्वसुचना दिल्यास वीज वीतरण यंत्रणेचे संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. अश्या खोदकामांमुळे महावितरणच्या भुमिगत उच्चदाब वाहिनीचे नुकसान झाल्यास वीजपुरवठा सुरळीत करणे क्लेषदायक असते, व त्याचा फ़टका सामान्य ग्राहकांना बसतो. यामुळे ग्राहकांमध्ये महावितरणविरोधात रोषही निर्माण होतो, हे सर्व टाळण्यासाठी विकास कार्याकरिता खोदकाम करणा-या प्रत्येक संस्थेने एकमेकांशी समन्वय साधल्यास त्याचा कुणाला त्रास होणार नाही, किंबहुना संबंधित कामही सहजतेने होतील. वीज कंपन्यांना विश्वासात न घेता खोदकाम करणा-या कंत्राटदाराविरोधात कारवाई होईलच मात्र वीज ग्राहकांना झालेला त्रास आणि मनस्ताप याची भरपाई होणे अशक्य आहे, यामुळे असे खोदकाम करायचे असल्यास विज वितरण कंपनीला विश्वासात घेणे आवश्यक आहे.

  आज बहुतेक संस्था विकासक किंवा कंत्राटदाराच्या माध्यमातून कामे करीत असल्याने ती कामे लवकर पुर्ण व्हावीत, यासाठी संबंधीत कंत्राटदार प्रयत्नशिल असतो व त्यात तो इतर विभागाशी समन्वय करण्याचे टाळतो, यामुळे विकासकार्यासाठी खोदकाम करणा-या कंत्राटदारांना संबंधित संस्थांनी याबाबत रितसर कळवूनच कामे करण्याच्या सुचना करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े सर्व संबंधितांना करण्यात आले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145