Published On : Mon, Apr 23rd, 2018

देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी नक्षलविरोधी कारवाई महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा दलांचे अभिनंदन

Advertisement

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड-एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षादलांनी रविवारी (दि. २२ रोजी) केलेल्या कारवाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशंसा केली असून देश आणि संविधानाच्या रक्षणासाठी ही कारवाई महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. या कारवाईत नक्षलवादी संघटनेच्या दोन कमांडरसह सोळा जणांच्या दलाचा पोलिसांनी खात्मा केला होता.

मुख्यमंत्री म्हणाले, नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी कार्यरत असलेल्या सी-६० आणि सीआरपीएफ या दलांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संयुक्तपणे राबविलेली ही कारवाई खूपच महत्त्वपूर्ण आहे. नक्षलवाद्यांविरोधात करण्यात आलेली ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये सुरक्षा दलांची कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.