Published On : Mon, Aug 6th, 2018

मराठा आरक्षणावरून आणखी एका युवकाची आत्महत्या

Advertisement

राज्यात मराठा आरक्षणावरून आत्महत्या करण्याचे सत्र अद्याप सुरूच आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे तसेच पाण्याअभावी पिकाचे नुकसान होत असल्याने निराश होऊन बरमाचीवाडी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील महादेव बाराखोते या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

त्यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली आहे.

महादेव बाराखोते यांना बरमाचावाडी गौर शिवार येथील गट नंबर ४३५ व बरमाचीवाडी येथील शिवारात गट नंबर १२१, १२२ असे या तिन्ही गट नंबर मध्ये एकूण १ हेक्टर ९ आर क्षेत्र होते. या पूर्ण क्षेत्रात सोयाबीनची त्यांनी पेरणी केली होती.

परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे पिके वाळून जात आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे शैक्षणिक सवलत नाही, नोकरी मिळत नाही या विवंचनेत महादेव बाराखोते होते. रविवारी रात्रीच्या सुमारास महादेव हे शेतात झोपण्यासाठी गेले होते.

सकाळ होऊन सुद्धा घरी न परतल्यामुळे कुटुंबातील मंडळी शेतात गेली असता महादेव यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नोंदवण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

महादेव बाराखोते या युवकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. मी महादेव बाराखोते (गाव बरमाचीवाडी, ता. कळंब) मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे तसेच दरवर्षी पावसाअभावी सोयाबीन वाळून होणाऱ्या नुकसानीमुळे गळफास घेऊन आत्महत्या करत आहे, असे या चिठ्ठीत लिहिले आहे.