Published On : Fri, Jan 20th, 2023

अंकित तिवारीच्या लाईव्ह कॉन्सर्टने रविवारी खासदार क्रीडा महोत्सवाचे समापन

ग्रेट खलीची विशेष उपस्थिती : यशवंत स्टेडियमवर सोहळ्याचे आयोजन
Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे सुप्रसिद्ध पार्श्वगायक अंकित तिवारी यांच्या लाईव्ह कॉन्सर्टने समापन होणार आहे. रविवारी २२ जानेवारी ला सायंकाळी ५.३० वाजता धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोपीय सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.

खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रणेते केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवितील. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डब्ल्यूडब्ल्यूई मधील वर्ल्ड हेवी वेट चॅम्पियन द ग्रेट खली, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आमदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती असेल. शहरातील नागरिकांनी प्रवेशिका प्राप्त करून समारंभाला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

सर्वोत्तम पुरूष पार्श्वगायक आणि सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक हे दोन्ही फिल्मफेअर पुरस्कार पटकाविणारा अंकित तिवारी खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्यात आपल्या गाजलेल्या गीतांनी नागपूरकरांना रिझविणार आहे. अंकित तिवारी यांचा लाईव्ह कॉन्सर्ट आणि समारोपीय मुख्य सोहळा अनुभवण्यासाठी खासदार क्रीडा महोत्सव समितीद्वारे प्रवेशिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. सोहळा पूर्णत: नि:शुल्क असून प्रवेशिका अनिवार्य आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉलमधील मुख्य कार्यालय आणि समारोपीय कार्यक्रमस्थळ यशवंत स्टेडियम येथे प्रवेशिका उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. इच्छूकांनी त्वरीत दोन्ही स्थळी संपर्क साधून आपल्या प्रवेशिका प्राप्त कराव्यात, असेही आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.

येथे मिळणार प्रवेशिका

१. समारंभ स्थळ : यशवंत स्टेडियम, धंतोली

२. खासदार क्रीडा महोत्सव मुख्य कार्यालय : ग्लोकल मॉल, हल्दीराम समोर, सीताबर्डी

खासदार क्रीडा महोत्सव