नागपूर – विदर्भाच्या विकासात एक नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. नागपुरात जागतिक स्तरावरचं अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि स्पेनमधील ‘फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल’ या सुप्रसिद्ध कंपनीदरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे नागपूरला जागतिक दर्जाचं प्रदर्शन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नवं ओळखपण मिळणार आहे.
या प्रकल्पांतर्गत नागपुरात सर्व आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. फडणवीस यांनी सांगितलं की, “या केंद्राची रचना नागपूरच्या वारशाशी आणि इतिहासाशी जोडलेली असावी. तसेच हे ठिकाण विविध वाहतुकीच्या साधनांनी सहज पोहोचण्याजोगं असावं.”
या कार्यक्रमात स्पेनचे भारतातील राजदूत जुआन अँटेनियो, ‘फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड झेपाटेरो, तसेच जिल्हाधिकारी विपिन इटनकर उपस्थित होते.
स्पेनच्या प्रतिनिधींनी भारतातील झपाट्याने होत असलेल्या तांत्रिक प्रगतीचे कौतुक करत, “महाराष्ट्रासोबत काम करण्याची संधी आम्हाला अभिमानाची वाटते,” अशी भावना व्यक्त केली. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापारिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पामुळे नागपूर शहराचं नाव देशाच्या पलीकडे उजळणार असून, आंतरराष्ट्रीय परिषदा, प्रदर्शने आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी हे केंद्र एक प्रमुख आकर्षण ठरेल.