Published On : Mon, Nov 18th, 2019

पत्रकारितेच्या गतवैभवासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न आवश्यक – जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर: लोकशाहीमध्ये चारही स्तंभाना महत्त्वाचे स्थान असून, यामध्ये पत्रकारीतेतून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. समाजात बदल होत असतो, तो स्विकारणे आवश्यक आहे. लोकशाहीतील इतर तीन स्तंभांप्रमाणे पत्रकारितेमध्ये कालानुरुप बदल होत आहेत. त्यामुळे पत्रकारितेला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी माध्यमकर्मींनी जाणिवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

प्रेस क्लब येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क कार्यालय, श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील जनसंवाद विभागाचे मोईज हक, जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे हे उपस्थित होते.

‘आजची पत्रकारिता व समाजमाध्यमे’ या विषयावर बोलताना समाज कोणासाठी बदलायचा थांबत नाही. तसे पत्रकारितेत समाजमाध्यमांचे वर्चस्व स्विकारले गेले पाहिजे. बदलत्या काळानुरुप वर्तमानपत्राचे स्वरुप बदलत असून, त्यातील मजकूर, ई पोर्टल्स, वृत्तवाहिन्यांची 24 तास सुरु असलेली बातमीदारी आली आहे. आरोग्य, विज्ञान, पर्यावरण, मनोरंजन अशा विविध अंगांनी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या त्यांचे स्वरुप बदलत आहेत. त्यामुळे बदल हा पत्रकारितेतील वेगळे वैशिष्ट्ये ठरले आहे. त्यामुळे पत्रकारितेतील माध्यमकर्मीनी न घाबरता आत्मचिंतन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी केले.

समाज हा गतिशील आहे. त्यामुळे माध्‍यमे ही समाजासाठी आवश्यक गरज बनली आहेत. पत्रकारिता करतांना समाजाला मते पटवून देण्यासाठी पत्रकारांना त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल तसेच त्यांना सृजनक्षमता विकसित करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी नागपूर विद्यापिठातील जनसंवाद विभागाकडून फेकन्यूजवर समाजामध्ये जाणिवपूर्वक जनजागृती करण्यात येत असल्याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

माध्यमांमध्ये काम करताना पत्रकाराने राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे. बदलत्या काळात गळेकापू स्पर्धेपासून दूर राहत वाचकांना वस्तुस्थिती दाखवणे आवश्यक आहे. पत्रकारिता करताना खटले दाखल होणे समजू शकतो मात्र निवृत्तीनंतरही खटले सुरु असणे ही ओळख असल्याची मिश्कील टिपण्णी जेष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी केली. पत्रकार विरोधी कायद्यात बदल करण्याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज असून, वृत्तवाहिन्यांनी टीआरपी वाढवताना ब्रेकींग न्यूजच्या नादात आपली विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुधीर पाठक यांनी विविध उदाहरणे देत वाचक वा वृत्तवाहिन्यांचे सजग प्रेक्षकच माध्यमांवर वचक ठेवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. समाजमाध्यमे वापरकर्त्यांनी माध्यमांवर पोस्ट करत माहिती देणे आवश्यक असले तरीही ती पोस्ट करताना सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवत कर्तव्य आणि जबाबदारीचे भानही ठेवणे आवश्यक असल्याचे सुधीर पाठक यांनी सांगितले.

यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी वाढत्या वेब न्यूज पोर्टलबाबत तिसऱ्या प्रेस कमिशनवर गांभिर्याने विचार करण्याची गरज असून, त्यानुसार नियमन होणे आवश्यक असल्याचे विशद केले. इतर व्यवसायांमध्ये पदवी आवश्यक असते तसे पत्रकारिता करताना पत्रकार पदवीधारक असावा. तसेच पत्रकार हल्ला विरोधी कायद्यावरही पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. पत्रकारितेचे काळानुरुप बदलते स्वरुप आणि आव्हाने याबाबत प्रदीप मैत्र यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिरीष बोरकर आणि मोईज हक यांचीही समायोचित भाषणे झाली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती शैलजा वाघ-दांदळे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती सहायक श्रीमती अपर्णा यावलकर-डांगोरे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील जनसंवाद विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.