Published On : Mon, Apr 15th, 2024

स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसचा उपक्रम

Advertisement

वर्धा – सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ अलाईड सायन्सेसअंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांकरिता औद्योगिक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भेटीत विद्यार्थ्यांना तांत्रिक माहितीसोबतच उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.

या उपक्रमात नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (व्हीएनआयटी) परिसरातील व्ही.आर. जामदार सीमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स इंडस्ट्री येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील एमसीए, बीसीए व बीएस्सी द्वितीय सत्राच्या ५७ विद्यार्थ्यांनी भेट देऊन तेथील कार्यपद्धती समजून घेतली. यावेळी, सीमेन्समधील अनुभवी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत औद्योगिक क्षेत्रातील अनेक बाबी समजावून सांगितल्या.

त्यांना सीमेन्स येथील विविध निर्मिती प्रक्रिया, पायाभूत सुविधा आणि तांत्रिक अशा सर्वसमावेशक माहितीसोबतच रोबोटिक्स, प्रोडक्ट डिझायनिंग व व्हॅलिडेशन, टेस्ट व ऑप्टिमायझेशन, आयओटी, ऑटोमेशन व प्रगत उत्पादन प्रक्रिया अशा वैविध्यपूर्ण बाबी अनुभवता आल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्यात कौशल्ये विकसित करणे, उद्योगातील तज्ज्ञ, तंत्रज्ञ व सहयोगी यांच्याशी संवाद साधणे, परस्पर देवाणघेवाण, त्यातून व्यक्तिमत्त्व विकास साधणे आणि आगामी काळातील व्यावसायिक जीवनात त्याचा अवलंब करणे, या उद्देशाने या औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. ही औद्योगिक भेट सहल शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. चित्रा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. सुप्रिया नारद, प्रा. सुधीर अग्रमोरे, प्रा.मोना डेकाटे यांच्या संयोजनात आयोजित करण्यात आली होती.