नागपूर: बारावीच्या निकालानंतर आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावीच्या निकालाची घोषणा अखेर उद्या, १३ मे २०२५ रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
दहावीची परीक्षा मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आली होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून एक पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यामध्ये निकालाशी संबंधित सविस्तर माहिती, टक्केवारी आणि आकडेवारी दिली जाणार आहे.
निकाल कसा आणि कुठे पाहाल?
विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत वेबसाईट्सवर भेट द्यावी लागेल:
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
results.targetpublications.org
या संकेतस्थळांवर लॉगिन करताना विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव प्रविष्ट करणे आवश्यक आहे.