Published On : Thu, Jun 7th, 2018

कलबुर्गी हत्याकांडातही अमोल काळेचा हात

Advertisement

पुणे : गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटक झालेल्या हिंदू जनजागृती समितीशी संबंधित अमोल काळेचा प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याकांडातही हात असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली आहे. कलबुर्गी यांच्या घरात गेलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक जण अमोल काळे होता. कलबुर्गी कुटुंबातील एका व्यक्तीने अमोल काळेला ओळखल्याची माहिती दिली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीप आणि मनोहर इडावे अशी या चौघांची नावे आहेत. यातील अमोल काळे हा चिंचवडचा रहिवासी असून चौघेही आरोपी सनातन संस्था आणि त्यांच्याशी संबंधित हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत.

गौरी लंकेश प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार कलबुर्गी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अमोल काळेची ओळख पटवली आहे. एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ रोजी पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या दोन हल्लेखोरांपैकी एक अमोल काळे होता, अशी माहिती समोर आली आहे. आता याबाबतची माहिती एसआयटीने कलबुर्गी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला दिली आहे. पुरावे गोळा केल्यावरच याबाबत माहिती दिली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.