Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

संविधानातील पृष्ठांवर प्रकाशित जाहिरातीमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त ;भदंत ससाईंनी घेतली दखल

Advertisement

नागपूर– भारतीय संविधानातील आतिल पृष्ठांवर जाहिरात प्रकाशित करून त्या प्रतींची विक्री करणाऱ्या दोन्ही दुकानदारांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने बाहेर केले. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदंत आर्य नागार्जुन सूरेई ससाई यांनी या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि दीक्षाभूमीत पोहोचले.

स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संविधानाच्या प्रति विकणाऱ्या दोघांनाही दीक्षाभूमी परिसरातून बाहेर केले. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. संविधान आमचा प्राण आहे, संविधान आमच्या श्वास आहे. संविधानाच्या प्रकाशित प्रतींना कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही, असा ठाम विश्वास ससाई यांनी यावेळी व्यक्त केला.

भीमराज सेनेचे विदर्भ अध्यक्ष रवी नितनवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गंभीर प्रकार रविवार ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आणला, तसेच या प्रकरणाची लेखी तक्रार बजाज नगर पोलिस ठाण्यात केली. बजाज नगर ठाण्यातील पोलिस तात्काळ दीक्षाभूमीत पोहोचले. जाहिराती असलेल्या संविधानाच्या काही प्रती पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या गंभीर प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायात संतापाची लाट उसळली तसेच भदंत ससाई दुखी झाले.

ससाई यांनी आज सोमवारी दीक्षाभूमीत जाऊन समितीचे सदस्य गजघाटे यांच्याशी चर्चा केली. हा गंभीर प्रकार असल्याने दोन्ही विक्रेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. त्यांनी पुन्हा दीक्षाभूमी परिसरात दुकान लावू नये यासाठी भदंत ससाई बजाज नगर पोलिसांना निवेदन देणार आहेत.

Advertisement

यावेळी ससाईंनी दुकानातील बुद्ध आणि आंबेडकरी साहित्याची पाहणी करीत काही गालबोट तर लागले नाही, याची शहानिशा करून घेतली. या चर्चेदरम्यान अनुयायांचा रोष लक्षात घेता ससाई यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी भिक्खु संघ, धम्म सेना, भीमराज सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. बजाज नगर पोलिसांचाही ताफा होता.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.