
नागपूर : हॉटेलच्या आडून सुरू असलेल्या कथित देहव्यवसायाचा नागपुरात पर्दाफाश करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनपुत्र नगर परिसरातील हॉटेल रॉयल मेंशन येथे सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) संयुक्त छापा टाकला. या कारवाईत समीना वसीम शेख (वय ४४) हिला अटक करण्यात आली. मध्य प्रदेशातील एका प्रौढ महिलेला देहव्यवसायासाठी ग्राहकासमोर आणल्याचा आरोप तिच्यावर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित देहव्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला. व्हॉट्सॲपवर महिलेचे छायाचित्र पाठवून दोन हजार रुपयांत सौदा ठरल्याचा आरोप आहे. त्यानंतर हॉटेलमध्ये खोली बुक करण्यात आली. संशयित महिला पीडितेला घेऊन खोलीत पोहोचताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिला सुमारे महिनाभरापूर्वी मध्य प्रदेशातून नागपुरात आली होती. ती हुडकेश्वर परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. संशयित महिला अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून महिलांना देहव्यवसायात ढकलत असल्याचाही आरोप आहे.
या कारवाईत दोन हजार रुपये रोख आणि सुमारे १२ हजार रुपये किमतीचा मोबाइल फोन यासह एकूण १४ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत.



