मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवच्या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता. या जागेसंदर्भात मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर तिन्ही नेत्याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा सुटला असून याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
महायुतीमध्ये धाराशिव, नाशिक हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. या जागेवर असलेला तिढा रविवारी रात्री झालेल्या बैठकीत सुटला आहे. त्यानंतर सोमवारी सकाळी देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत धाराशिव, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरविले.
धाराशिवमधून विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांचे नाव जवळपास लोकसभेच्या उमेदवारीसाठी निश्चित झाले आहे.
तर नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण उपस्थित होते. आज प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेऊन धाराशिव लोकसभा उमेदवाराची घोषणा करणार आहेत.