पावसामुळे झालेल्या नुकसानीचा सरकारला जाब विचारणार -अजित पवार

Advertisement

नागपूर : ४ तारखेपासून नागपुरात सुरु झालेल्या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कुठल्याही प्रकारचे कामकाज होऊ शकले नाही. अधिवेशनाचा पहिला दिवस शोकप्रस्तावनेत गेला त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विदर्भासह नागपुरात झालेल्या अतिवृष्टीने दोन्ही सभागृहातील पहील्या आठवड्याचे कामकाज स्थगित करावे लागले. विदर्भातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी कुठलंही नियोजन या सरकारने केले नाही. शेवटी कामकाज न झाल्याने झालेला खर्च हा राज्यातील जनतेच्या खिशातूनच करण्यात आला. त्यामुळे या सरकारने कुठल्या हट्टापायी हे अधिवेशन घेतले. आणि याला जबाबदार कोण अशी विचारणा विरोधी पक्षांतर्फे आज दोन्ही सभागृहात करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली.

अधिवेशनाचा पहिला आठवडा पावसामुळे वाया गेल्यानंतर आजपासून दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र पहिल्या आठवड्यात कुठलेही कामकाज झाले नसल्याने विरोधक चांगलेच संतापले आहे. या सरकारला नागपुरात पडणाऱ्या पावसाची संपूर्ण कल्पना होती. मात्र त्यासाठी कुठलीही खबरदारी घेण्याची तसदी घेतली नाही. पावसामुळे रेल्वेसेवा विमानसेवा विस्कळीत झाल्याने कुठल्याही आमदारांना आणि मंत्र्यांना आपल्या क्षेत्रात जात आले नाही. मुंबईतील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये घरी जाता आले नाही. शेवटीया सगळ्या प्रकाराला भाजपा आणि शिवसेनेचे सरकार जबाबदार आहे.यामुळे लाखो रुपयांचा अपव्यव झाला. याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात होत आहे. या सर्व प्रकाराबद्दल आपण आणि विरोधक दोन्ही सभागृहात साकारला जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले.

त्याचप्रमाणे काल संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. संपूर्ण जगात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांना सन्मान दिला जातो. त्यांच्या विचाराने आपल्या देशात जातीय सलोखा कायम आहे. मात्र ज्या मनूच्या विचाराने केवळ ३ ते ४ टक्के लोक प्रेरित आहे. अश्या मनू विचाराला संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारापेक्षाही श्रेष्ठ म्हणतात ही, निंदनीय बाब आहे. या देशातील जनता मनुवादी विचारांना कदापिही स्वीकारणार नाही. असेही ते म्हणाले. मात्र संभाजी भिडेंनी केलेले वक्तव्य त्यांचे नसून यामागे दुसरे कोणी लोक आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.