आपली बसच्या ताफ्यात होणार आणखी १५ ई-बसचा समावेश
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या आपली बसच्या ताफ्यामध्ये आणखी १५ बसेसचा समावेश होण्याला गती मिळाली. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या १५ मिडी ए.सी. इलेक्ट्रिक बसेस नागरिकांकरिता नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाला देण्यात येणार आहेत. यासंदर्भात झालेल्या करारनाम्यावर गुरूवारी (ता.९) स्वाक्षरी करण्यात आली.
यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. , स्मार्ट सिटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री चिन्मय गोतमारे, मोबिलिटी आणि इन्फ्रा विभागाचे महाव्यस्थापक श्री राजेश दुफारे, परिवहन व्यस्थापक श्री रवींद्र भेलावे, प्रशासकीय अधिकारी श्री रवींद्र पागे, टाटा मोटर्सचे श्री. आदित्य छाजेड उपस्थित होते.
१५ इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी स्मार्ट सिटीतर्फे निविदा मागविण्यात आले होते. मेसर्स टाटा मोटर्स यांची निम्नतम निविदा असल्याने बसेसच्या पुरवठ्यासाठी त्यांची निवड करण्यात आली. इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्या संदर्भात टाटा मोटर्सचे श्री. आदित्य छाजेड यांच्यासोबत करार करण्यात आला.