शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
नागपूर: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयातर्फे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दिव्यांगांसाठी एडीआयपी योजना आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचे शिबिर रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात गेल्या 22 मार्चपासून आयोजित करण्यात आले आहे. येत्या 31 मार्चपर्यंत हे शिबिर चालणार आहे.
या शिबिराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली व शिबिराच्या व्यवस्थेची व अन्य माहिती घेतली. याप्रसंगी ना. गडकरी यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी नगरसेवक अविनाश ठाकरे व अन्य उपस्थित होते. या शिबिराला दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराचे प्रमुख माजी नगरसेवक व भाजपनेते बाल्या बोरकर हे आहेत.
वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सहायक साधने या शिबिरात मोफत वितरित करण्यात येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेली साधने देण्यात येत आहेत.
राष्ट्रीय वयोश्री योजनेद्वारे 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या साहित्य वाटपासाठी या शिबिरात नोंदणी व तपासणीय करण्यात येत आहे.
महापालिकेतर्फे झोनस्तरावर ही शिबिरे घेतली जात आहेत. मनपाच्या झोननिहाय तपासणी शिबिरात सहभागी होऊ न शकलेल्या पात्र व्यक्तींनी 31 मार्चपर्यंत कविवर्य सुरेश भट सभागृहातील शिबिरात नोंदणी व तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रफुल्ल शिंदे यांनी केले आहे.
या शिबिराचा लाभ दिव्यांगांनी व ज्येष्ठांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन शिबिरप्रमुख बाल्या बोरकर यांनी केले आहे.