Published On : Tue, Mar 31st, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यात प्रशासकीय फेरबदल; विविध विभागात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Advertisement

मुंबई : राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करत ३१ मार्च २०२६ रोजी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वित्त, कृषी, आपत्ती व्यवस्थापन तसेच मुंबई महापालिकेसह विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

राज्याच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदाऱ्या सांभाळणार असून या बदलांकडे प्रशासनिक वर्तुळात विशेष लक्ष लागले आहे.

बदल्यानुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची बदली करून त्यांची नियुक्ती मुंबईत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी भिडे यांना मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.

कृषी विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांना वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंगल यांची बदली मृद व जलसंधारण विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.

Advertisement

पोकरा प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांना कृषी विभागाचे सचिवपद देण्यात आले असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन विभागाची धुरा सोपवण्यात आली आहे.

तसेच लहु माळी यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माणिक गुरसळ यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिवपद सोपवण्यात आले आहे.

राज्य कर विभागात संयुक्त आयुक्त असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
या सर्व बदलांमुळे राज्याच्या प्रशासनात नव्या कामकाजाला गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.